नवी दिल्ली | New Delhi
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे अभिमानास्पद असून मराठीचा वापर-व्यवहार सर्व स्तरांत व सर्वदूर वाढला पाहिजे. प्रमाण लेखना इतकीच बोली भाषाही महत्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतले तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी केले. नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसर्या सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी उपस्थित होते.
डॉ.भवाळकर पुढे म्हणाल्या, मराठी भाषेची संमेलने आयोजित करतांना. मराठी लिहिणारी, बोलणारी, मराठीत व्यवहार करणारी माणसे वाढणे आणि ग्रामीण आणि सीमावर्ती भागात मराठी भाषेला पुढे नेण्याचे प्रयत्न करणार्या लेखक, कवी, प्रकाशकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मराठी भाषा शिक्षणातून कमी होत चालली आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीतूनच व्हावे. इंग्रजी माध्यमातून मराठीचे शिक्षण देतांना उच्च मराठीची पुस्तकेच शिकवावी. मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी सर्वांनी कृतीशील होण्याची आणि तिला वैश्विकतेकडे नेतांना आपणही विशालतेच्या भावनेने समावेशकतेचे सूत्र स्विकारण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर ते विशिष्ट वर्गाचे संमेलन असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, आज संमेलनाची व्याप्ती विस्तारते आहे. साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर साक्षरतेचा उपयोग नाही. पुस्तकापेक्षा संत कवींनी, पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या महिला कवयित्रींनी जास्त ज्ञान दिले आहे. भाषा समाजातील सर्व परंपरा, लोकव्यवहार आणि विचारांची वाहक असते. लोककलेत नृत्य, गाणी, नाट्य, संगीत, कला, वाद्य, कथा असते, एखादी देवता यांच्याशी लोककला जोडलेली असते. जीवनाचं समग्र आकलन लोककलेसोबत प्रत्यक्ष लोकजीवनात असतं. लोकजीवनातील सर्व साधनं मिळून लोकसाहित्य बनते. लोकसाहित्यात या सगळ्याचा अविष्कार होतांना दिसतो, असे डॉ.भवाळकर म्हणाल्या.
डॉ.शोभणे म्हणाले, मराठी भाषेचा प्रवास गेल्या अडीच हजार वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे आणि पुढेही असाच जोमाने सुरू राहणार आहे. बृहन्महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्था मराठी भाषेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. या साहित्य संस्थांमध्ये वावरणारी नवी पिढी देखील आस्थेने काम करीत आहे. अशा साहित्यिक संस्थांना शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळाल्यास या प्रयत्नांना बळ मिळेल. नव्या मंडळीच्या मनात साहित्याविषयी गोडी निर्माण करण्याचे कार्य जुन्या मंडळींनी करणे आवश्यक आहे.
अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षांकडे सोपवितांना कृतार्थतेची भावना असल्याचे नमूद करून डॉ.शोभणे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे संमेलन असल्याने त्याला महत्व आहे, हा योग अतिशय महत्वाचा आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक अक्षरयात्रा-मराठी साहित्यिकांचे समाजभानचे प्रकाशन डॉ.भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.