Tuesday, March 25, 2025
Homeनगरमुलाखतीतून राजकीय नेत्यांनी उलगडला कार्यप्रवास

मुलाखतीतून राजकीय नेत्यांनी उलगडला कार्यप्रवास

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीतील राजकारणात दरबारी प्रवृत्ती आहे. इथे उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. तरीही दिल्लीतील राजकारणाचा कार्य परिसर मोठा आहे. मराठी माणसाकडे कमी महत्त्वाकांक्षा आणि अल्पसंतुष्टता असल्याने मराठी माणूस दिल्लीच्या राजकारणात कमी पडतो, असे विचार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. माझ्यातील लेखकाला शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक विषमता दिसल्याने मी समाजकार्याकडे वळले. त्यातूनच पुढे राजकारणात स्थिरावले, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी स्पष्ट केले. मला राजकारणाची मनापासून आवड होती. अनेक थोर राजकारणी वक्त्यांची भाषणे ऐकण्यात मला रस होता. परंतू प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश होईल, याचा मी कधी विचारच केला नाही. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींमुळे आपल्या आयुष्याला वेगळे वळण लागले, अशा भावना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद, पुणे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या विषयावर विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी राजीव खांडेकर, प्रवीण बर्दापूरकर यांनी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात विशेष मुलाखतीचा कार्यक्रम रंगला.

दिल्लीतील राजकारणात मराठी माणूस मागेच : पृथ्वीराज चव्हाण
मी राजकीय कुटुंबातून आलो असलो तरी घरातील शिक्षणाचे संस्कार माझ्यात रुजले होते. त्यामुळेच उच्च शिक्षण पूर्ण केल्याशिवाय मी राजकारणाकडे वळलो नाही. माझे प्राथमिक शिक्षण कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढे वडील खासदार झाल्यामुळे आमचे वास्तव्य दिल्लीतच राहिले. तेथे पहाडगंज येथील नूतन मराठी विद्यालयाच्या शाळेत मला आठवी ऐवजी सातवीत प्रवेश मिळाला, कारण दोन्हीकडील शिक्षणामध्ये खूप तफावत होती. तेव्हापासूनच योग्यतेपेक्षा एक पायरी खाली संधी मिळणे नशिबी आले. दिल्लीतील राजकारणी इरसाल असतात. त्यांच्याबरोबर व्यवहार करताना मराठी माणसाचे वेगळेपण महत्त्वाचे ठरते. परंतू मराठी माणसाकडे महत्वाकांक्षेची कमतरता असल्यामुळे तसेच तो अल्पसंतुष्टही असल्यामुळे केंद्रीय राजकारणात मराठी आवाज घुमला नाही. या उलट उत्तरेकडे सगळे राजकीय नेते दिल्लीत राहतात आणि केंद्रीय राजकारणच करतात. भाषेचा न्यूनगंड, दिल्लीतील हवामान, खाणे-पिणे या विषयांचा बाऊ करून मराठी माणूस दिल्लीतील राजकारणात मागेच पडला आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेने मराठी नेत्यांना साथ देऊन केंद्रीय राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. येथे संगीत खुर्चीचा खेळ होऊ देता कामा नये. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी मी केंद्रात मंत्री असताना याची प्रक्रिया सुरू झाली होती. पुढे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना भाषेविषयी समिती स्थापन करून त्याचा अहवाल माझ्यामार्फतच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला पाठविला गेला, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

द्विध्रुवीकरणामुळे राजकारणात प्रवेश : डॉ. नीलम गोर्‍हे
मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. माझे शिक्षण मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. तसेच साने गुरुजी विद्यालय आणि नंदादीप विद्यालयात शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहायला लागले. सातवीत असताना मी काव्य केले. व्यक्त होण्यासाठी मी लिहिती झाले. पुढे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना विविध सामाजिक चळवळींशी जोडली गेले. तेव्हापासूनच समाजातील सर्वच क्षेत्रात तफावत, जातीभेद, स्त्री-पुरुष भेद मनाला जाणवत होता. अत्याचार घडल्यानंतर कृती करण्याऐवजी तो होऊच नये, या करिता मी आंदोलनांमध्ये सहभागी होऊ लागले. विद्या बाळ, माधव गडकरी आदींच्या प्रेरणेतून कार्यप्रेरित झाले आणि पुन्हा एकदा लिहिती झाले. याच काळात राजकीय द्विध्रुवीकरण घडत होते. मला विधानपरिषदेत कार्य करण्याची इच्छा होती. त्याच वेळेस बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. त्यांनी मला मराठी भाषा, महिला धोरण या विषयावर कार्य कर असा सल्ला दिला. त्यामुळेच मी समाजकारणातून राजकारणात प्रवेश केला.

मधु दंडवते यांच्या पराभवाची सल कायम राहणार : सुरेश प्रभू
व्यक्तीगत आयुष्यात मला मधु दंडवते, भाई वैद्य अशा नेत्यांविषयी मन:पूर्वक आदर आहे. मधु दंडवते यांच्याविरुद्ध निवडणूक लढणे ही माझ्या आयुष्यातील घोडचूक आहे. ते जर निवडून आले असते तर त्या वेळेच्या राजकीय परिस्थितीमुळे पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होऊ शकला असता. मी निवडून आल्यापेक्षा मधु दंडवते हरले याचे दु:ख माझ्या मनात कायमच राहणार आहे. मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे ऐकण्याची आवड होती. एका प्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांनी माझे भाषण ऐकले तेव्हाच त्यांनी मला सांगितले की, आमचे सरकार आले तर तुलाच अर्थमंत्री करणार. बाळासाहेब यांचा मोठेपणा एवढा की, त्यांनी मला खरेच मंत्री केले. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मी केंद्रीय मंत्री झालो. माझ्या राजकीय कारकिर्दीकरिता बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनाचा मोठेपणा कारणीभूत आहे. अनेकदा मी राजकारणाच्या लहरीपणाचा बळी ठरलो. रेल्वे खात्याच्या कार्यक्षमतेचा परमोच्च बिंदू गाठला असतानाच झालेल्या रेल्वे अपघाताला मी कारण ठरलो, या नैतिक जबाबदारीच्या भावनेतून राजीनामा दिला. मी आजही भाजपामध्ये असून अखेरपर्यंत भाजपातच राहणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...