Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनागली पिकाचा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम

नागली पिकाचा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम

ननाशी । वार्ताहर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आत्मा यंत्रणेच्या साह्याने दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुर्गम गावात नागली पिकाचा ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

- Advertisement -

या प्रकल्पांतर्गत गांडोळे, रडतोंडी व चीकाडी या तीन गावांतील 50 एकर क्षेत्रावरील 50 लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. स्थानिक वाणाचे नागली बियाणे सतत वापरात असल्याने त्याची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नागली पिकाचे केवळ घरगुती वापराएवढे उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील जनतेसाठी पौष्टिक पारंपारिक आहार असलेल्या नागली पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे.

स्थानिक आदिवासी जनतेच्या घरगुती वापरासोबतच बाजारात पौष्टिक तृणधान्य म्हणून नागली व तिच्या विविध उपपदार्थांना असलेली मोठी मागणी विचारात घेऊन फुले- कासारी या वाणाची ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. प्रति एकरी एक किलो मूलभूत बियाणे आत्मा यंत्रणेमार्फत पुरविण्यात आलेले आहे. या प्रकल्पात सहभागी शेतकर्‍यांसाठी नुकतीच गुगल मीटद्वारे विविध मान्यवरांचे मार्गदर्शनपर प्रशिक्षण आयोजीत आले होते.

यामध्ये नागली उत्पादन तंत्रज्ञान, ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत नोंदणी व महाबीज मार्फत त्याचे प्रमाणीकरण याबाबतीत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रकल्पातील सर्व शेतकरी उपस्थित होते. निवड केलेल्या गावातील शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी बचत गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करून शेतकर्‍यांना या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन कृषी व्यवस्थापन व तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) यंत्रणेचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र निकम यांनी यावेळी केले.

या प्रशिक्षणासाठी कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. कैलास खैरनार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ संतोष बन, नाशिक जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी शाम जोशी, दिंडोरी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमदाडे, मंडळ कृषी अधिकारी ललीत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक संजय सावंत, कृषी सहाय्यक उज्ज्वला गावित, महाबीज प्रतिनिधी सूर्यवंशी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बिरारी यांनी प्रयत्न केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या