Friday, May 3, 2024
Homeनाशिकस्वच्छता सेवकांचे आंदोलन सुरूच

स्वच्छता सेवकांचे आंदोलन सुरूच

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मनपात ( Malegaon Municipal Corporation )मानधन तत्त्वावर काम करत असलेल्या सेवकांना कामावरून कमी करण्यात आल्याने वंचित आघाडीतर्फे सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांतर्फे बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पगार किती? तसेच केव्हापासून कामावर सेवकांना रुजू करून घेतले जाईल याबाबत चर्चेत काहीच निष्पन्न न झाल्याने बैठक निष्फळ ठरली.

- Advertisement -

दरम्यान, मनपात मानधन तत्त्वावर काम करणार्‍या ( working on honorarium basis )सेवकांना पुन्हा स्वच्छता ठेक्यात कामावर सामावून घेण्याच्या मागणीसाठी वंचित आघाडीचे आंदोलन सुरूच राहणार असून याप्रश्नी मनपा प्रशासनाने दाद न दिल्यास न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे यांनी दिली.

स्वच्छतेचा ठेका देण्यात आल्याने मनपात मानधन तत्त्वावर काम करणार्‍या सेवकांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली सेवकांनी आंदोलनास प्रारंभ केला. वेळोवेळी निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची दखल मनपा अधिकारी घेत नसल्याने आयुक्त दालनाला कपिल आहिरे यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकण्यात आले होते.

या आंदोलनाची दखल घेत आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी आघाडी पदाधिकारी व सेवकांना याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करत चर्चेसाठी बोलावले. चर्चेत मानधनावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कायम करणे, ठेक्यामध्ये कर्मचार्‍यांना टाकून त्यांचे सेवा मुदत कमी करण्यात येते तसेच कर्मचार्‍यांना ठेकेदार त्यांच्या मनमानी पद्धतीने वापरून घेतो, नियमाप्रमाणे पगार न देता रोखीने पगार अदा करून त्यात भ्रष्टाचार केला जातो आदी प्रकार अहिरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. मानधन तत्त्वावर काम करणार्‍या सर्व सेवकांना नगरविकास भवनच्या निर्देशानुसार सेवेत कायम करावे, अशी मागणी केली.

मनपा आयुक्तांनी साफसफाई ठेका सद्यस्थितीत रद्द करता येणार नाही. परंतु नगरविकास भवनकडून आलेल्या पत्रानुसार नियमानुसार कार्यवाहीसाठीची पूर्तता करून नगरविकास भवनला कर्मचार्‍यांची कागदपत्रे सुपूर्द करण्यात येतील. मानधन तत्त्वावर काम केलेल्या व सध्या कामावरून कमी केलेल्या कर्मचार्‍यांना ठेक्यात सामावून घेतले जाईल व ठेका पद्धतीत काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना त्यांचे पगार ठरल्यानुसार व थेट बँक खात्यात जमा होईल, साप्ताहिक सुट्टी, ठेका पद्धतीत नियमानुसार ज्या सुविधा आहेत त्या सर्व लेखी स्वरुपात देऊन त्यावर अंमलबजावणी करू, असे आश्वासन दिले.

मात्र ठेक्यात मिळणारा पगार किती, कामावर कधी रुजू करण्यात येईल याबाबत लेखी खुलासा न झाल्याने ठेक्यात काम करण्यास कर्मचारी तयार नसल्याने बैठक निष्फळ ठरली. महापालिकेला आर्थिक संकटात टाकणारा ठेका रद्द करण्यात यावा, यासाठी न्यायालयात दाद मागितली जाईल, असे अहिरे यांनी सांगितले. शिष्टमंडळात महासचिव संजय जगताप, जितरत्न पटाईत, युवराज वाघ, राजू धिवरे, शशिकांत पवार आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या