Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगअमेरिकन राज्यघटनेचा शिल्पकार

अमेरिकन राज्यघटनेचा शिल्पकार

१७७० साल अमेरिकेतील जनतेचा इंग्लंडविरुद्ध रोष शिगेला पोहचत होता. त्याच दरम्यान बोस्टन शहरातील मुख्य रस्त्यावर एक घटना घडली. बोस्टनमध्ये तैनात ब्रिटिश सैनकांनी केलेल्या गोळीबारात पाच अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. सदोष मानवी हत्येच्या आरोपाखाली ८ ब्रिटिश सैनिकांच्या विरोधात बोस्टनच्या न्यायालायात खटला भरण्यात आला.

ब्रिटिशांविरोधात आधीच वातावरण तापले असतांना ही घटना म्हणजे असंतोषाच्या भडक्याला तडकाच होता. बोस्टनच्या न्यायालयात एकही वकील ब्रिटिश सैनिकांच्या बाजूने खटला लढवण्यास तयार नव्हता. अशावेळी एक तरुण वकील त्यांचे वकिलपत्र घेण्यास तयार झाला. सामाजिक जीवनात लोकप्रिय असलेल्या या तरुण वकिलाचे हे पातक त्याला अत्यंत महागात पडणारे होते. त्याची पर्वा न करता त्याने ही जोखीम स्वीकारली. अमेरिकन वसाहतीत एक उदयोन्मुख युवा नेतृत्व म्हणून फुलू लागले.त्याचे राजकीय व सामाजिक जीवन या तरुण वकिलाने पणाला लावले होते. याप्रकारात त्याला आपला जीव देखील गमवावा लागला असता.

- Advertisement -

सदोष मनुष्य वधाचा खटला असलेल्या ब्रिटिश सैनिकांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी उभे राहणे म्हणजे आपल्याच देशवासीयांच्या नजरेतून उतरणे. याची जाणीव या वकिलाला नव्हती असे नव्हे; परंतु आपल्या तत्त्वांशी,मूल्यांशी आणि सद्सदविवेक बुद्धीशी प्रामणिक राहण्याचा त्याचा पिंड होता. त्याच्या मतानुसार,”वास्तव हे अटळ आणि शाश्वत असते. आपल्या इच्छा,भावना,अपेक्षा वास्तव बदलू शकत नाहीत.” हेच वास्तव न्यायालयात त्याला मांडायचे होते. जेणे करून ब्रिटिश सैनिकांची न्याय बाजू मांडली जाऊन त्यांचा हाकनाक बळी जाता कामा नये. तरुण वकिलाने आपले सर्व कसब पणाला लावले आणि ८ पैकी ६ सैनिकांची निरपराध म्हणून सुटका झाली आणि २ जणांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना शिक्षा झाली. हा खटला चालवण्यासाठी या वकिलाला ‘आठ गिनिज’ एवढा शुल्लक मेहनताना मिळला होता. ज्यामध्ये तो एक बुटांचा जोड खरेदी करू शकला असता.

बोस्टनची जनतेच्या मनात या तरुण वकिलाविषयी राग व रोष निर्माण झालेला होता. असे असतांना या तरुणाचे व्यक्तिमत्व असे करिष्माई होते की तो १७७० च्या जून महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत मॅसेच्युसेटस् प्रांताच्या जनरल काँसिलवर प्रतिनिधी म्हणून निवडून आला. हा तरुण वकील म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेचा शिल्पकार,अमेरिकेचा पहिला उपराष्ट्राध्यक्ष आणि दुसरा राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स. मॅसेच्युसेटस् प्रांतातील एका समृद्ध-प्रतिष्ठित घरात ३० ऑक्टोबर १७३५ ला जॉन ॲडम्स यांचा जन्म झाला. आज त्यालाच क्विन्सि मॅसेच्युसेटस् प्रांत असे संबोधले जाते.

१६३८ साली इंग्लंडमधील हेन्री ॲडम्स हा इंग्लंडमधील सॉमरसेट प्रांतातून नशीब आजमविण्यासाठी अमेरिकेच्या मॅसेच्युसेटस् प्रांतात येऊन स्थायिक झाला. आपल्या कर्तबगारीवर ॲडम्स घराणे मॅसेच्युसेटस्मध्ये लवकरच नावारूपाला आले. हेन्री ॲडम्स याच्या ६ व्या पिढीतील वंशज असलेल्या जॉन ॲडम्स यांनी हार्वर्ड विद्यापीठातून कायदयाची पदवी प्राप्त केली. ब्रिटिश राजसत्तेने अमेरिकेवर इंग्लंडमध्ये उत्पादित केलेला कागदच वापरण्याची सक्ती करणारा ‘स्टॅम्प ॲक्ट’ लादला. स्टॅम्प ॲक्ट विरोधात झालेल्या जनआंदोलनातून जॉन ॲडम्स ह्या तरुण बुद्धिमान वकिलाची सर्वप्रथम सार्वजनिक ओळख निर्माण झाली.

एक निष्णात कायद्येतज्ज्ञ म्हणून जॉन ॲडम्स लवकरच प्रसिद्ध झाला. जॉन ॲडम्स हे एक विलक्षण असे व्यक्तिमत्व होते. लोकानुयापेक्षा सद्सद्विवेकाला प्राधान्य हे जनसामान्यांना न आवडणारे वर्तन त्याच्या व्यक्तिमत्वाचे व्यवच्छेदक लक्षण होते. ॲडम्समध्ये काही विलक्षण गुण होते. उच्चविद्याविभूषित असल्याने त्याच्या बुद्धिला एक वेगळीच धार होती. साहस,देशभक्ती आणि प्रामाणिकता त्याच्यात ठासून भरलेली होती. त्याने आपल्या जीवनाचा बहुतांश भाग देशसेवेसाठीच खर्च केला. असे असतांना त्याच्यात काही दोष देखील होते. हे दोष म्हणजे अहंकार,चिडिचिडेपणा,हट्टीपणा आणि आडमुठेपणा. त्यामुळे तो सर्वमान्य नेता कधीच होऊ शकला नाही. असे असले तरी अमेरिकेच्या राष्ट्रपित्यांमध्ये त्याचे नाव जॉर्ज वॉशिंग्टननंतर घेतले जाते. थॉमस पेन याने अमेरिकेच्या संपूर्ण स्वातंत्र्याची संकल्पना आपल्या लेखनातून सर्वप्रथम सैद्धांतीक स्तरावर मांडली.

शब्दांमधील या संकल्पनेला वास्तवात उतरवण्यासाठी आवश्यक पहिले पाऊल जॉन ॲडम्स याने उचलेले. त्याचा जन्म ज्या मॅसेच्युसेटस् वसाहतीत झाला. ही वसाहत ब्रिटिश सत्तेच्या अधिपत्याखाली येत नव्हती. ही इंग्लंडमधून आलेल्या इंग्रंजांनीच वसवलेली वसाहत असली तरी वसाहत स्थापन करतांना ती इंग्लंडच्या राजाशी करार करून वसवण्यात आलेली होती. एका अर्थाने मॅसेच्युसेटस्वर ब्रिटिश सत्तेचा राजकीय हक्क नव्हता. काळाच्या ओघात ब्रिटिश राजसत्तेला याचा विसर पडला. मॅसेच्युसेटस्वर त्यांनी आपला फास आवळण्यास सुरवात केली. ब्रिटिशांची गुलामी अमान्य असलेला पहिला प्रभावी नेता म्हणून १७७० नंतर मॅसेच्युसेटस्च्या राजकीय क्षितीजावर जॉन ॲडम्सचा उदय झाला. संपूर्ण स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व ही थॉमस पेनची लिखित कल्पना साक्षात साकार करण्यासाठी ॲडम्सने सर्वप्रथम पुढाकार घेतला. १७७४ साली मॅसेच्युसेटस्च्या जनतेने त्याला काँन्टिनेंटल काँग्रेसमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले काँग्रेसमध्ये अमेरिकेतील १३ वसाहतींचे एकत्रिकरण करून एक स्वतंत्र संघराज्य स्थापन करण्याचा प्रस्ताव त्याने मांडला.

एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अमेरिकन जनतेच्या मनात राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग पेटवण्याचे काम यामुळे झाले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची ही पहाट होती. जॉर्ज वॉशिंग्टन यांना क्रांतीसेनेचे सरसेनापती पद देण्याचा प्रस्ताव ॲडम्सनेच मांडला आणि सर्व अडथळे दूर करत तो मंजूर देखील करून घेतला. काँन्टिनेंटल काँग्रेसमध्ये ॲडम्सचा असलेल्या जबरदस्त प्रभावामुळे अमेरिकन स्वातंत्र्य आणि संघराज्य यांची नांदी झाली. जॉन ॲडम्स यांना उत्तर कॅरोलिना प्रांतीय काँग्रेसच्या ठरावानुसार सरकारसंदर्भात एक विस्तृत संकल्पना आणि रूपरेखा तयार करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार १७७६ च्या वसंत ऋतुमध्ये ॲडम्स यांनी ‘थॉटस ऑन गव्हर्नमेंट’ नावाचा एक अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल दीर्घनिबंध लिहिला. ज्यामध्ये त्यांनी सरकार आणि राज्यघटनेचा मसूदा यावर आपले विचार मांडले. यामध्ये ॲडम्स यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण विधान केले ते म्हणतात,” राजकारण हे मानवी आंनदांचे विज्ञान आहे. तसेच जनतेला मिळणा-या सुखसुविधा जनता ज्या शासनाच्या अंतर्गत जगत असते. त्या शासनाच्या राज्यघटनेवर अवलंबून असतात.”

जॉन ॲडम्स यांच्या हे विधान कोणत्याही देशातील जनतेच्या सर्वांगीण विकासात व कल्याणात देशाच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करते. ॲडम्स यांच्या निबंधातील अनेक सूचनांचा स्वीकार करून उत्तर कॅरोलिना राज्याची प्राथमिक घटना तयार करण्यात आली. अधिकारांचे विभाजन ही संकल्पना मांडणारा जॉन ॲडम्स शक्यतो पहिला राजकीय विचारवंत असावा. कोणत्याही राज्याचे अथवा देशाच्या व्यवस्थेत प्रशासन,न्यायव्यवस्था आणि लोकप्रतिनिधी हया तीन घटकांमध्ये अधिकारांचे विभाजन करण्यात यावे. हे तीन घटक कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असतात. हा विचार सर्वप्रथम मांडणारे जॉन ॲडम्स यांच्या राजकीय प्रगल्भतेची व परिपक्वतेची जाणीव आपल्या होऊ शकते. ‘थॉटस ऑन गव्हर्नमेंट’ मध्ये त्यांनी थॉमस पेन यांनी आपल्या ‘कॉमन सेन्स’ या ग्रंथात मांडलेल्या ‘विधानसभा’ हया संकल्पनेला मात्र विरोध केलेला आहे. त्यांच्या मते संघराज्य व्यवस्थेत विधानसभा जुलमी अथवा स्वकेंद्री होण्याची शक्यता असते. यासाठी विधानपरिषद सदृष्य दुस-या सदनाची संकल्पना ते सूचवतात. जेणे करून हया दोन्ही सभा एकमेकांवर नियंत्रण ठेऊ शकतील.

‘थॉटस ऑन गव्हर्नमेंट’ मध्येच भावी अमेरिकेच्या राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून जॉन ॲडम्स यांच्या ऐतिहासिक योगदानाची झलक पाहता येते. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यासाठी जेंव्हा मसुदा समितीची निर्मिती करण्यात आली तेंव्हा जॉन ॲडम्स यांचा समावेश अग्रकमाने करण्यात आला. थॉमस जेफरसरन,बेंजामिन फ्रँकलिन आणि रॉजर शेरमन यांचा देखील मसुदा समितीत समोवश होता. अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचे लिखाण प्रामुख्याने थॉमस जेफरसन यांनी केले. त्यांना जॉन ॲडम्स यांनी सहकार्य करावे असे ठरवण्यात आले. जाहीरनामा तयार झाल्यानंतर तो काँन्टिनेंटल काँग्रेससमोर मांडण्यात आला. यावेळी जॉन ॲडम्स यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि ठामपणे जाहीरनामा काँग्रेससमोर सादर केला.

तसेच आपल्या प्रभावी मांडणीतून तो मंजूर करण्यास काँग्रेसला भाग पाडले. स्वातंत्र्याच्या जाहीरनामा निर्मितीपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत एक देश म्हणून अमेरिकेच्या जडणघडणीत जॉन ॲडम्स यांचे योगदान अत्यंत महत्वाचे व मौलिक असे राहिले. असे असले तरी त्यांच्यासारखा उपेक्षित राष्ट्रपिता,अमेरिकन राज्यघटनेचा शिल्पकार व राष्ट्राध्यक्ष देखील अमेरिकेच्या इतिहासात दुसरा कोणीही नाही. थॉमस पेन यांच्या इतके नसले तरी जॉन ॲडम्स यांना अमेरिकेनी ब-याच अंशी उपेक्षिलेच आहे. याला अमेरिकेचा इतिहास साक्ष आहे.हे अक्षम्यच म्हणावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या