Friday, May 3, 2024
Homeनगरशिक्षक बँकेतील पदोन्नती कायदेशीरच - साळवे

शिक्षक बँकेतील पदोन्नती कायदेशीरच – साळवे

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये कर्मचार्‍यांना पदोन्नती देणे आरबीआयच्या आदेशानुसार आवश्यक असल्याने ती सर्व नियम पाळूनच दिली जाईल. याबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना निराधार आरोप करून गैरसमज पसरवणे हा विरोधकांचा धंदा झाला आहे. स्वतःच्या भावाला शिपायाचा क्लर्क करताना बेकायदेशीररित्या चार वेतनवाढी घेणार्‍यांना शिक्षक बँकेतील कर्मचारी पदोन्नतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी आधी स्वतःला तपासून पाहावे असा सल्ला प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गौतम साळवे यांनी दिला आहे.

- Advertisement -

या पंचवार्षिकमध्ये शिक्षक बँकेमध्ये पदोन्नतीची पदे भरली गेली नाहीत. संचालक मंडळाची ती भूमिका होती. मात्र, शाखाधिकार्‍यांच्या नेमणुका करणेबाबत आरबीआयच्या आदेशानुसार कार्यवाही करणे क्रमप्राप्त असल्याने बँकेतील कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली जाणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही हालचाल झालेली नसताना आधीच संशय व्यक्त करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. बडतर्फ कर्मचार्‍याला सर्व नियम धाब्यावर बसवून सेवेत घेताना शिपायाचा क्लर्क करून चार वेतनवाढी जादा दिल्या हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का ? असाही प्रश्न साळवे यांनी उपस्थित केला आहे.

शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने वार्षिक सभेमध्ये स्वतःहून बँकेची निवडणूक घेण्यात यावी असा ठराव केला आहे, याचा अर्थ संचालक मंडळाला या पदावर राहण्यात कोणतेही स्वारस्य नाही व निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत हे सिद्ध होते. मात्र, निवडणुकीसाठी कोर्टात जाणार असल्याची धमकी देऊन सभासदांमध्ये गैरसमज पसरविण्याचा धंदा काही लोकांनी सुरू ठेवला आहे. शासनाच्या आदेशानुसार योग्य वेळी निवडणुका होतीलच. यात संचालक मंडळाचा कोणताही दोष नाही. यंदाची वार्षिक सभा देखील अत्यंत शांततेने सुरळीत पार पडली आहे. त्यामुळे दरवर्षी गोंधळ घालणार्‍यांना मुद्देच राहिले नाहीत आणि म्हणून आता ते खोटेनाटे आणि निराधार आरोप करीत आहेत असेही साळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या