Saturday, May 4, 2024
Homeनगरवक्फ संस्थेच्या सव्वाचार एकर जमिनीची बेकायदेशीर विक्री

वक्फ संस्थेच्या सव्वाचार एकर जमिनीची बेकायदेशीर विक्री

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील मध्यवर्ती व अतिशय महत्त्वाच्या भागात असलेल्या नवीन नगर रोड परिसरातील 4 एकर 17 गुंठे जागा वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. ही जागा वक्फ संस्थेच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला असून या जागेवर झालेलेेे खरेदी-विक्रीचे व्यवहार बेकायदेशीर असल्याने सर्व बांधकाम परवाने रद्द करावे, अशी नोटीस महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला पाठवली आहे. याशिवाय या जागेतील 140 मालमत्ताधारकांनाही नोटिसा बजावण्यात आल्यानेे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरातील ताजणे मळा लगत ही जागा आहे. पंचवीस वर्षांपूर्वी याठिकाणी शेतजमीन होती. त्यानंतर काही वर्षातच या जागेला सोन्याचा भाव आला. शहरातील प्रमुख रुग्णालय, बँका व इतर व्यवसाय याच परिसरातच सुरू झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही जागा वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.

सदर मालमत्ता ही संगमनेर येथील वक्फ संस्था मुस्लिम समाज दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह उर्फ बारामासी या संस्थेची असल्याचा दावा या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहेे. संगमनेर येथील शेख अब्दुल गफार अब्दुल लतीफ यांनी सदर जागा मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याबाबत त्यांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे तक्रार केलेली आहे. वक्फ मंडळाने याची गंभीर दखल घेऊन दिनांक 30 मार्च 2021 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयाला नोटीस पाठवली आहे.

नवीन नगर रोड परिसरातील जुना सर्वे नंबर 803 नवीन स. नंबर 149 मधील 4 एकर 17 गुंठे ही मालमत्ता दर्गाह फिर हजरत फखरुल्लाह शाह उर्फ बारामासी या संस्थेची आहेे. या मालमत्तेचेे कोणत्याही खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद करू नये तसेच घेतलेल्या नोंदी रद्द कराव्यात, असे आदेश वक्फ मंडळाने दुय्यम निबंधकांना केले आहेत. सदर मालमत्तेची नोंद इनाम जमीन पत्रकात वर्ग 2 नुसार आहे. या मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचेेेे व्यवहार झाल्यामुळे वक्फ संस्थेचेे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमनेर नगरपालिकेने या मालमत्ते मधील बांधकाम परवाने रद्द करावेत व पूर्व परवानगीशिवाय कुणालाही बांधकाम परवाना देऊ नये, असेेे आदेश नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले आहे. पोलीस अधिकार्‍यांनी या मालमत्तेमध्ये बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

या मालमत्तेत शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची बांधकामे आहेत. मालमत्तेमध्ये बांधकाम करणार्‍या 140 जणांना नोटिसा बजावण्यात आल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या