Friday, May 3, 2024
Homeनगरआ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु - राहुल रोहमारे

आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु – राहुल रोहमारे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकर्‍यांचे आधारस्तंभ असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना 2014 पासून बंद होती. तत्पूर्वी 2014 पर्यंत माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पदरमोड करून ही योजना चालविली. मात्र 2014 पासून ही योजना बंद होती. आ. आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे ही योजना सलग दुसर्‍या वर्षी सुरु करण्यात आली असल्याची माहिती जि. प. सदस्य राहुल रोहमारे यांनी दिली आहे.

- Advertisement -

उजनी चारी उपसा जलसिंचन योजना 2014 पासून बंद होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करणार असा शब्द आ. आशुतोष काळे यांनी या भागातील नागरिकांना दिला होता. त्यामुळे दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी मागील वर्षापासूनच ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे या परिसरात शेती व पिण्याच्या पाण्याची जाणवणारी टंचाई दूर झाली आहे.

यावर्षी सुद्धा या योजनेचे वीजबिल थकल्यामुळे ही योजना पुन्हा बंद पडते की काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला होता. मात्र आ. आशुतोष काळे यांनी आपले वडील माजी आमदार अशोकराव काळे यांचा कित्ता गिरवत स्वत: या योजनेचे थकलेले वीजबिल भरले आहे. त्यामुळे ही योजना यावर्षी पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे.

दसर्‍याच्या दिवशी या योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वीजमोटारी सुरु करून उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणार्‍या रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ज्यांनी उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेकडे त्यांच्या कार्यकाळात साफ दुर्लक्ष केले त्यांना आता या योजनेचा पाझर फुटला असून नागरिकांप्रती खोटा कळवळा दाखवून फुकटचे श्रेय लाटण्याचा काहींचा डाव आहे. मात्र उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी आ.आशुतोष काळे सक्षम असून इतरांनी आता आपली लुडबुड थांबवावी.

– बाबुराव थोरात, अध्यक्ष उजनी चारी योजना.

- Advertisment -

ताज्या बातम्या