Saturday, May 4, 2024
Homeनगरसरपंचास जातीवाचक शिवीगाळ, दोघांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल

सरपंचास जातीवाचक शिवीगाळ, दोघांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील कासारे येथील ग्रामपंचायत सरपंचास जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये दोघांविरुद्ध, तर एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सरपंचासह तिघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले.

- Advertisement -

कासारे येथील सरपंच महेश अण्णासाहेब बोर्‍हाडे (वय 28) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, मंगळवारी (दि. 26) दुपारी एकच्या सुमारास आपण व बहीण आपल्या मुलीस तळेगाव दिघे येथे दवाखान्यात घेऊन येत असताना आरोपी कृष्णाजी सुर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामण कार्ले (रा. कसारे) यांनी पाठीमागून येत नांदूर शिंगोटे ते लोणी जाणार्‍या रस्त्या दरम्यान वडझरी शिवारातील फॉरेस्ट रस्त्यानजीक आपल्या दुचाकीला त्यांची गाडी आडवी लावून जाण्यास प्रतिबंध केला. गळ्यात चपलाचा हार घातला.

तुमच्या जातीच्या सरपंचाचा आम्ही असाच सत्कार करतो, असे जातीवाचक बोलून पानउतारा केला. बहिण सोडवासोडव करण्यास आली असता तिलाही धक्काबुक्की करून मागे लोटले. तुम्हाला किती केसेस करायच्या ते करा असे बोलून मोटार सायकलवरून निघून गेले. सदर फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

दुसरी फिर्याद 30 वर्षीय महिलेने दिली. त्यात म्हटले आहे की, पती समवेत आपण मंगळवारी (दि. 26) दुपारी 1.10 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना आरोपी सरपंच महेश आण्णासाहेब बोर्‍हाडे, चंद्रकांत अण्णासाहेब बोर्‍हाडे व एक महिला (रा. कासारे) दुचाकीवरून येऊन आरोपींनी लज्जाउत्पन्न होईल, असे वर्तन केले व शिवीगाळ दमदाटी करून गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेत आमच्या नादी लागला तर तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली. सदर फिर्यादीनुसार विनयभंगासह अन्य कलमान्वये तिघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या