Saturday, May 4, 2024
Homeनगरसात्रळच्या राजकीय आखाड्यात सत्तेचा मिळतोय आलटून पालटून कौल

सात्रळच्या राजकीय आखाड्यात सत्तेचा मिळतोय आलटून पालटून कौल

सात्रळ | Satral

राहुरी तालुक्यातील पश्चिम-उत्तरेकडील सात्रळ हा जिल्हा परिषद गट राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक समजला जातो. हा परिसर प्रवरा पट्ट्यात येत असल्याने या भागात विखे आणि कडू गटाचे राजकीय अस्तित्व प्रत्येक निवडणुकीत अबाधित राहते. प्रत्येक निवडणुकीत विखे आणि कडू गटात राजकीय ज्वालामुखी कायमच धगधगता असतो. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे विखे आणि कडू गट आणि कार्यकर्ते त्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही या पारंपरिक विरोधी गटात निवडणुकीची चुरस बघायला मिळणार आहे. विखे गट हा भाजपा तर कडू गट हा राष्ट्रवादी पक्षाबरोबर असल्याने येथे प्रत्येक निवडणुकीत तुंबळ राजकीय संघर्ष बघायला मिळतो. सात्रळ हा जिल्हा परिषदेचा गट आणि या गटात पंचायत समितीचे गुहा व सात्रळ हे दोन गण आहेत.

- Advertisement -

सात्रळ हा गट प्रवरा कारखाना आणि राहुरी कारखान्याच्या ‘कॉमन झोन’मध्ये येतो. या गटाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यांदाच अरुण कडू यांच्या रूपाने मिळाला. सात्रळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात येथील मतदार आलटून पालटून दोन्हीही गटाला सत्तेचा कौल देत असल्याचा इतिहास आहे. नंतर निवडणुकीत हायटेक यंत्रणा आल्याने त्यातच नवीन पिढीची ‘एण्ट्री’ झाली. त्यामुळे नंतर राजकीय समिकरणे बदलून गेली आहेत. सात्रळ गटात मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी खा. प्रसाद तनपुरे व अरुण कडू यांच्या मार्गदर्शनानुसार ना. प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाच्या सुरेशराव वाबळे, किरण कडू, यांनी आपले राजकीय कौशल्य व नेतृत्व पणाला लावल्याने पुन्हा राष्ट्रवादीच्या नंदाताई गाढे या विजयी झाल्या.

यंदाच्या निवडणुकीत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात विखे गटाकडूनही जोरदार तयारी सुरू झाली आहे. मागील पंचवार्षिकच्या गटातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विखे गटाने विश्वास कडू यांच्या रूपाने स्थानिक सक्षम नेतृत्व राजकीय सारीपाटावर आणले आहे. विश्वास कडू हे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक नेते असून ते प्रवरा कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याच खांद्यावर सध्या विखे गटाची राजकीय जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर कडू गटही जय्यत तयारीनिशी या निवडणुकीत उतरणार आहे. विखे गटाचे विश्वास कडू व वसंतराव डुक्रे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय डावपेच सुरू झाले असून राष्ट्रवादीच्या गटाकडून सुरेशराव वाबळे व किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली या गटात रणनिती ठरणार आहे.

या गटावर विखे आणि राष्ट्रवादीचे आलटून पालटून प्राबल्य असते. मागील विधानसभा निवडणुकीत या गटाने राष्ट्रवादीचे उमेद्वार प्राजक्त तनपुरे यांना मोठे मताधिक्य दिले आहे. सात्रळपासूनच तनपुरे यांच्या विजयाचा अश्व नंतर राहुरी मतदारसंघात विजयी ठरला. त्यामुळे सध्या या गटावर राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. या गटाचा सत्तेचा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी विखे गट सक्रीय झाला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी ना. प्राजक्त तनपुरे तर गटावर पुन्हा भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे यांची राजकीय व नेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या