Tuesday, May 7, 2024
Homeनगरतिसर्‍या लाटेशी मुकाबला करण्यासाठी 29 हजार बेडस् सज्ज

तिसर्‍या लाटेशी मुकाबला करण्यासाठी 29 हजार बेडस् सज्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. दुसर्‍या लाटे निर्माण झालेले प्रश्न आणि त्यातून घेतलेल्या बोधानूसार आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन साठा, रेमडेसीव्हीरचे इंजेक्शन, फ्लॅविपिरावीरच्या गोळ्यांचा मुबलक साठा करून ठेवण्यात आलेला आहे. जिल्ह्यात व्हेंटीलेटर बेडस्, नॉन व्हेंटीलेटर बेडस्, ऑक्सिजन बेडस् आणि कोविड केअर सेंटरमधील बेडस् असे सर्व प्रकारातील बेडस् मिळून 29 हजार 216 बेडस् करोनाच्या तिसर्‍या लाटेशी मुबाकला करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

आरोग्य विभागाकडील माहितीनूसार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील संभाव्य तिसर्‍या लाटेशी मुकाबला करण्यासाठी साधन सामु्रगी उपलब्ध करत आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेत उच्चांकी 30 हजार 221 रुग्ण हे 7 मे रोजी सक्रीय होते. हा आकडा गृहीत धरून त्याच्या दीड पट संख्या तिसर्‍या लाटेत एकाच दिवशी 45 हजार 331 रुग्ण बाधित आल्यास उपाययोजना करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केलेले आहे.

यात कमी अथवा सौम्य लक्षणे असणार्‍या 29 हजार 465 रुग्ण हे होम क्वारंटाईन करता येवू शकतात. 15 हजार 866 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येवू शकते. यात 7 हजार 933 हे शासकीय तर 7 हजार 933 हे खासगी रुग्णालयात दाखल करता येईल, असे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 690 खासगी आणि सरकारी मिळून व्हेंटीलेटर बेडस्, 1 हजार 327 हे नॉन व्हेंटीलेटर बेडस्, 6 हजार 375 ऑक्सिजन बेडस्, आणि 20 हजार 824 बेडस् हे जनरल कोविड केअर सेंटरमध्ये सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यात ऑक्सिजन असणार्‍या खाटांची संख्या 6 हजार 375 असून व्हेंटीलेटरची गरज 633 असून आतापर्यंत 415 उपलब्ध करण्यात आले आहेत. जिल्ह्यात दुसर्‍या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजनच्या मागणीच्या तीन पट 228 मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी गृहीत धरून ऑक्सिजन निर्मिती व साठवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत ऑक्सिजनचे एकूण निर्माण (पीएसए) व साठवणूक क्षमता (एलएमओ) 294.67 मेट्रीक टन करण्यात आली आहे. तिसर्‍या संभाव्या करोना लाटेतील मागणी लक्षता घेता जिल्ह्यात एकूण 37.67 मेट्रीक टन साठवणूक क्षमता निर्माण करण्याचे काम प्रगती पथावर सुरू आहे. तसेच 27 पीएसए ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झालेले असून 18 एलएमओ प्रकल्पापैकी 16 कार्यान्वित झालेले आहे. 2 प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.

तसेच जिल्हा रुग्णालयात रेमडेसीव्हीर 100 मिलीचे 23 हजार 716 इंजेक्शन आणि फ्लॅविपिरावीरच्या 6 लाख 82 हजार 69 गोळ्या उपलब्ध आहेत. तर महानगर पालिकेकडे रेमडेसीव्हीर 30 हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत. म्युकरमायकोसिस उपचारसाठी अ‍ॅम्फोटेरीसीन बी 3 हजार 117 इंजेक्शन उपलब्ध आहेत.

……………….

……………..

…………..

49 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा शोध सुरू

जिल्ह्यात अतिजोखमिच्या देशातून 389 व कमी जोखमीच्या देशातू 305 प्रवासी आलेले आहेत. यात यातील 645 प्रवाशांचे अहवाल निगेटीव्ह आलेले असून तिन जणांचे करोनाचे अहवाल पॉझिटीव्ह आहे. उर्वरित 49 जणांचा शोध घेण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार जिल्ह्यात करोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी 13 हजार 370 ऑनलाईन अर्ज प्राप्त असून यातील 464 अर्ज नामंजूर करण्यात आले आहे.

लहान मुलांचे 270 व्हेंटीलेटर आणि नॉन व्हेंटीलेटर बेड तयार करण्यात आलेले आहेत. यात 64 बालरोग विभागाचे, 98 सरकारी आणि 172 खासगी रुग्णालयात 172 बेडस् आहेत. तर 675 हे ऑक्सिजन बेड असून यात 508 बालरोग विभागाचे, 140 शासकीय रुग्णालय आणि 535 हे खासगी रुग्णालयातील बेडस् आहे. यसह 1 हजार 317 हे कोविड केअर सेंटरमधील बेडस् असून हे सर्व शासकीय रुग्णालयातील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या