Tuesday, May 7, 2024
Homeनगरऔद्योगिक हब होण्यासाठी कोपरगावची परिस्थिती अनुकूल - ना. सुभाष देसाई

औद्योगिक हब होण्यासाठी कोपरगावची परिस्थिती अनुकूल – ना. सुभाष देसाई

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघाची औद्योगिक हब अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वच परिस्थिती अनुकूल असून कोपरगावात उद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. त्यावेळी ना. देसाईंनी औद्योगिक हब होण्यासाठी कोपरगावची परिस्थिती अनुकूल असल्याचे मान्य करून कोपरगाव मतदार संघात उद्योग उभारणीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे ग्वाही देवून त्याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील वारी येथे गोदावरी बायोरिफायनरीजच्या नविन केमिकल प्लॅन्टचे भूमिपूजन व संशोधन प्रयोगशाळेचे उदघाटन ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते व ना. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ना. आशुतोष काळे यांनी औद्योगिक हब होण्यासाठी कोपरगावची परिस्थिती कशी अनुकूल आहे याची सविस्तर माहिती उद्योग मंत्र्यांना दिली. त्यावेळी उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या भरभराटीसाठी नेहमी उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन दिले आहे.

त्याचबरोबर पर्यावरणाचा देखील र्‍हास होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री प्रामुख्याने घेतात. त्यांच्याच विचारांवर आम्ही मार्गक्रमण करीत असून कोपरगावची परिस्थिती उद्योग व्यवसाय उभारणीसाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे ना. आशुतोष काळे यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. औद्योगिक हब होण्यासाठी कोपरगावची परिस्थिती भौगोलिकदृष्ट्या देखील उत्तम असून पाणी देखील उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही मुंबईला आल्यावर आपण त्याबाबत लवकरच बैठक घेवू, अशी ग्वाही ना. सुभाष देसाई यांनी ना. काळेंना दिली.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, उद्योजक समीर सोमैय्या, अमृताबेन सोमैय्या, गोदावरी बायोरिफायनिरीजच्या कार्यकारी संचालक डॉ. संगिता श्रीवास्तव, संचालक सुहास गोडगे, नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राजेश परजणे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शिवसेना तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, अ‍ॅड. विद्यासागर शिंदे, मच्छिंद्र टेके, सरपंच सतीश कानडे, कान्हेगावचे उपसरपंच बाळासाहेब काजळे, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या