नंदुरबार | प्रतिनिधी-NANDURBAR
सोशल मीडीयावर (social media) आक्षेपार्ह स्टेटस (Status) ठेवणार्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा (police) पोलीस दलाने धडक कारवाई करत विविध ८ गुन्हे दाखल केले आहेत.
आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणार्या इसमांविरुध्द् भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील तसेच सायबर सेल नंदुरबार यांच्याकडून वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात आले होते.
तरीदेखील नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून काही गोष्टींचे निषेधार्थ किंवा समर्थनार्थ म्हणून सोशल मीडियावर दोन धर्मात जातीय तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो असे स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मागील एक आठवड्यात सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस किंवा मजकूर प्रसारित केल्यामुळे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे ३ इसमाविरुध्द तीन गुन्हे, अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे ०२ इसमाविरुध्द दोन गुन्हे,
शहादा पोलीस ठाणे येथे ०३ इसमाविरुध्द तीन गुन्हे असे एकुण ०८ गुन्हे दाखल करुन आक्षेपार्ह स्टेटस किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणार्यांना तात्काळ अटक करुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस किंवा मजकूर प्रसारित केल्याच्या निषेधार्थ बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे १ गुन्हा,
शहादा पोलीस ठाणे येथे १ गुन्हा, नवापूर पोलीस ठाणे येथे १ गुन्हा, अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे १ गुन्हा असे एकुण ४ गुन्हे तात्काळ दाखल करुन संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर धार्मीक भावना भडकविणार्या, दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करणार्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारित करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नये.
तसेच जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींनी आक्षेपार्ह पोस्ट ठेवून कायदा हातात घेवू नये. तसेच जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे कोणीही उल्लंघन करु नये. तसेच कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षकपी.आर.पाटील यांनी दिला आहे.