Saturday, May 4, 2024
Homeनगरदेशाला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज - जगधने

देशाला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज – जगधने

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च गुणवत्ता आहे. त्यांना करियरबाबत योग्य मार्गदर्शन वेळीच मिळणे आवश्यक आहे. कॉमर्समध्ये करिअरच्या अनेक उच्च संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी करिअरसाठी आपली क्षमता व अभिरुची ओळखून सीए, सीएस, सीएमए यासारखे वाणिज्य शाखेतील कोर्स निवडले तर चांगल्या प्रकारे कमी खर्चात व कमी वेळेत करिअर करता येईल. देशाला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. ती गरज पूर्ण करता येईल, असे प्रतिपादन रयतच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांनी केले.

- Advertisement -

रयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्ररुप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात आय.सी.एस.आय. स्टडी सेंटरच्या उद्घाटन समारंभप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात मीनाताई जगधने बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सीएस संजय पठारे, पुणे विभागीय सचिव ऋषिकेश वाघ, सीएस विशाल पाटील, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत सी. डी.जैन महाविद्यालय व आय.सी.एस.आय पुणे, चाप्टर ऑफ डब्ल्यू.आय.आर.सी.ऑफ आय.सी.एस. आय. यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

सीएस संजय पठारे यांनी, विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखावी. मनातील संदिग्धता दूर करावी. जीवनात योग्य मार्गदर्शन मिळवून जिद्दीने अभ्यास केला तर जीवनात निश्चित यश मिळवता येते, असे सांगितले. सीएस ऋषिकेश वाघ यांनी, रयत शिक्षण संस्था व महाविद्यालय विद्यार्थी केंद्रित व भविष्याचा विचार करत आहे. त्याचा लाभ घेऊन आपले करिअर उत्तम घडवा, असे आवाहन केले. तर सीएस विशाल पाटील यांनी, जे अशक्य आहे ते स्वप्न मला घडवायचे आहे. ते माझे ध्येय आहे. ते मला साध्य करावयाचे आहे. असा निश्चय करा, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, यश तुमचेच आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. संयोजन प्रा. प्रदीप यादव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आगरकर व डॉ. बापूसाहेब घोडके यांनी केले तर आभार प्रा. विवेक मोरे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या