Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यागुजरातमध्ये आज मतदान

गुजरातमध्ये आज मतदान

अहमदाबाद । वृत्तसंस्था Ahmedabad

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections) पहिल्या टप्प्यासाठी आज (दि.1) मतदान होणार आहे. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र विभागातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी तब्बल 788 उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisement -

गुजरातमध्ये आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत होत असे. परंतु यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आआपा) रूपाने तिसरा पक्ष रिंगणात आहे. आआपाने एकूण 182 पैकी 181 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांत आआपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवींचा समावेश आहे. ते द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथून निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळा आमदारपदी निवडून गेलेले कुंवरजी बावलिया, मोरबीचे कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा आणि आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया हेही रिंगणात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यासाठी भाजपच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी भाजप नेत्यांनी यय टप्प्यात अनेक सभांना संबोधित केले. पहिल्या टप्प्यात भाजप व काँग्रेसने प्रत्येकी 89 उमेदवार उभे केले आहेत. आपचे 88 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजपने नऊ, काँग्रेसने सहा आणि आपने पाच महिला उमेदवार उभ्या केल्या आहेत.

पहिल्या टप्प्यातील एकूण 788 उमेदवारांपैकी 718 पुरुष आणि 70 महिला उमेदवार आहेत. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने पहिल्या टप्प्यात 57, भारतीय आदिवासी पक्षाने (बीटीपी) 14, समाजवादी पक्षाने 12, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) चार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दोन उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय 339 अपक्षही रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या भागात एकूण दोन कोटी 39 लाख 76 हजार 670 मतदारांची नोंदणी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या