Saturday, May 4, 2024
Homeनगरअकोलेत भरले पारंपरिक वनौषधी वैद्यांचे दुर्मिळ संमेलन

अकोलेत भरले पारंपरिक वनौषधी वैद्यांचे दुर्मिळ संमेलन

अकोले |प्रतिनिधी| Akole

जंगली औषधी वनस्पतींची माहिती, परिचय होऊन ज्ञान व्हावे, औषध उपचारातून आजार नैसर्गिक पद्धतीने बरे व्हावेत. वनस्पतींचे जतन संवर्धन होऊन वृद्धी व्हावी. औषधी निर्मितीतून आदिवासींना रोजगार मिळवून, व्यवसाय उद्योगाची निर्मिती होऊन आर्थिक लाभातून कुटुंबाला जगणे सुलभ व्हावे. पारंपरिक वैद्यांना मार्गदर्शन व्हावे. त्यांचे भय दूर जाऊन, संरक्षण मिळावे अशा अनेक उद्देशातून डॉक्टर भाऊराव उघडे यांच्या मार्गदर्शनातून दुर्मिळ व अनमोल वनौषधी पारंपरिक वैद्यांचे संमेलन व अगणित वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जे. एस. वाजे (आळेफाटा) होते. व्यासपीठावर डॉ. रमा कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. शेटे, डॉ. तुषार कोकाटे, साहित्यिक प्राध्यापक विठ्ठल शेवाळे, वनस्पती अभ्यासक रामलाल हासे, प्रा. व्ही. के. देशमुख, सर्पमित्र सचिन गिरी, मुख्याध्यापक सुभाष देशमुख, डॉ. मधुसुदन कुर्‍हाडे, डॉ. आदेश काशीद, तालुका आरोग्य पर्यवेक्षक विनोद भिसे, देवठाणचे सरपंच आनंदा गीर्‍हे आदी उपस्थित होते.

या संमेलनाचे आयोजन आदिम उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था उंचखडक खुर्द व मूळ आदी निवासी उत्कर्ष संस्था नवलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या मार्गदर्शन संमेलनास ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, जिल्ह्यातून इगतपुरी, शहापूर, मुरबाड, जुन्नर, संगमनेर, अकोले, पारनेर, राहुरी, सिन्नर, कन्नड येथील 201 पारंपरिक वैद्य स्वखर्चाने आले होते. जंगलातील आचकंद, हळदीचे सर्व दुर्मिळ प्रकार, डुंकरकंद, अमरकंद, रामकंद, रोहिणी साल, अंनतमुळ, शतावरी, हिरडा, बेहडा, करंजफळ, हाडसांद, पळस फुले, मूळ-साल, हनुमंत लाळ, रोहिडा, कळलाई मूळ, भुईकोहळा, फांगळा, भांरगी अशा नाना प्रकारच्या वनस्पतींचे पंचाग अवशेष आणून मांडले होते. वनस्पतींचा अनोखा ठेवा असलेले हे प्रदर्शन अकोले, येथील सांस्कृतिक भवनात आदिवाशींनी स्वखर्चातून भरविले होते. मात्र पत्रिकेवरील निमंत्रित महोदयांनी हजेरी लावली नाही व अकोलेकरांनीही पाहण्याचा लाभ घेतला नाही.

या पारंपरिक वैद्यांना डॉक्टर भाऊराव उघडे, प्राध्यापक विठ्ठल शेवाळे. डॉ. रमा कुलकर्णी, वैद्य दुबळीराम पथवे, डॉ. जे. एस. वाजे, पर्यावरणवादी रामलाल हासे, डॉ. एस. व्ही. शेटे, डॉ. विनोद भुसे, गुलाबराव सहाणे, यांनी मार्गदर्शन केले. आयोजकांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. वैद्य सखाराम डोके, नारायण जोंधळे व बालकलाकार राजश्री गांडाळ यांनी उपस्थितांचे गीतातून स्वागत केले.

आपले ज्ञान पुढील पिढीला द्यावे.आपल्या ज्ञानाचे व्यवसायात रूपांतर करावे. योग्य दरात औषधांची विक्री करावी. वनस्पतींची शास्त्रीय माहिती मिळवावी. औषधोपचार करणारे घरकुल व निसर्गोपचार केंद्रे तयार करावी. सर्वांनी संघटित होऊन संघटनेमार्फत काम करावे वनस्पतींची संकलन करताना वनस्पती नष्ट करू नये. तिची लागवड जतन व संवर्धन करावे निसर्ग व पर्यावरण सांभाळून, औषधी वनस्पतींची शेती करावी.

घर परिसर शेती बांधावर लागवड करावी. वनस्पतींचा दुरूपयोग करू नये, चुकीचे काम करू नये, वनस्पतींची विविध उत्पादने तयार करून स्वतःची पेटेंट तयार करावी. आर्थिक उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. औषधी वनस्पती प्रदर्शनात वैद्यांनी हजारो वनस्पती आणून मांडल्या होत्या. त्यापैकी काही प्रातिनिधीक स्वरूपात वनस्पतींची माहिती सांगितली. महिला वैद्य तुळसाबाई मधे, पौर्णिमा केदार, शशिकला मधे, सारिका कडाळी, सारिका फोडसे, प्रतीक्षा बगाड, सोमनाथ कातोरे, मंगेश पाचांगे, अनिल भालेकर,चंदर उघडे, किसन पोकळे, दुबळीराम पथवे आदींनी माहिती सांगितली.

सर्व वैद्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. संमेलन यशस्वी करण्यासाठी सखाराम डोके, बाळासाहेब मधे, मोहन पथवे, रेश्मा उघडे, सुनीता पथवे, नारायण जोंधळे, सागर गांडाळ, रावजी फोडसे यांनी परिश्रम घेतले. तर संमेलनात संजय साबळे, सोणू वाजे, दगडू गांडाळ, बबन खंडे, रवी डोके, बाळासाहेब मधे व अन्य वनस्पती प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊराव उघडे यांनी केले तर आभार आनंदा गिर्‍हे यांनी मानले.

जंगली औषधी वनस्पती जतन, संवर्धन व वृद्धी करून जैवविविधता, पर्यावरण संतुलन, निसर्ग संपदा वाढविणे, या कामी शासन विभाग आदिवासी प्रकल्प कार्यालय वनविभाग निसर्गप्रेमी यांनी पुढाकार घेऊन अशी संमेलने घेऊन, निसर्ग जागर व चळवळ वाढविणे गरजेचे आहे. वनस्पती माहिती व ज्ञानाचा प्रचार व प्रसार करून जनजागृती व प्रबोधनातून वनस्पती र्‍हास थांबविणे काळाची गरज आहे. वनसंपदा वाढविली पाहिजे.

– रामलाल हासे, अध्यक्ष निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ अकोले व औषधी वनस्पती अभ्यासक

- Advertisment -

ताज्या बातम्या