Saturday, May 4, 2024
Homeनगरढिसाळ नियोजन व राजकीय हस्तक्षेपामुळे पुणतांब्यातील अनेक बंधारे कोरडे

ढिसाळ नियोजन व राजकीय हस्तक्षेपामुळे पुणतांब्यातील अनेक बंधारे कोरडे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गोदावरी उजव्या कालव्यामार्फत ओव्हरफ्लोच्या पाण्यामार्फत पुणतांबा, चितळी, गोंडेगाव, रामपूरवाडी, जळगाव सह अनेक गावांतील बंधार्‍यांमध्ये पाणी सोडण्यात यावे ही परिसरातील शेतकरी वर्गाची मागणी होती. त्यानुसार पाटंबाधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी काही गावांतील काही बंधार्‍यांत पाणीही सोडले मात्र ढिसाळ नियोजनामुळे पुणतांबा परिसरात डेरा नालासह अनेक भागातील बंधारे कोरडे राहिल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात पाटबंधारे खात्याच्या कारभारविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

- Advertisement -

चालू वर्षी परिसरात अत्यंत अपुरा पाऊस पडलेला आहे. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. वाड्या वस्त्यांवर पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. कालव्याला ओव्हर फ्लोचे पाणी आल्यामुळे प्रत्येक गावाने आमच्या गावातील तळ्यात अगोदर पाणी सोडा यासाठी पाटबांधारे खात्याच्या अधिकार्‍यांना साकडे घातले. विशेष म्हणजे अनेकांनी आंदोलने सुद्धा केली. सध्या काही गावांत ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यामुळे तसेच पाण्याचा प्रश्न संवेदनशील असल्यामुळे अनेकांनी राजकीय नेत्यामार्फत पाणी सोडण्यासाठी दबावही आणला गेला. अधिकार्‍यांना सुद्धा राजकीय नेत्यांना नाराज करता येत नाही. त्यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करून काहींना न्याय दिला. मात्र अनेक गावांमधील बंधार्‍यांमध्ये पाणी सोडता आले नाही. काही गावांत तर रस्त्याच्याकडेला असलेल्या बंधार्‍यात पाणी सोडले मात्र ज्या शेतकर्‍यांनी स्वतःच्या जमिनी देऊन तसेच डिझेलसाठी 20-20 हजार खर्च करून बंधारे बांधले त्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवले.

पाटबंधारे खात्याच्या चितळी कार्यालयात नाशिकवरून तीन महिन्यांपूर्वी शाखा अभियंता बदलून आले आहेत. त्यांना अद्यापही चितळी शाखेचे तसेच 20 चारी शाखेची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी ज्या सूचना देतील त्यानुसार कार्यालयातील अनुभवी कर्मचार्‍यांकडून पाटपाण्याचे नियोजन केले. मात्र ग्रामस्थांच्या मागणीचा अंदाज न आल्यामुळे नेमक्या कोणत्या चारीला किती दिवस व कोणाच्या बंधार्‍यात पाणी सोडावे याबाबत गोंधळ झाला. त्यामुळे वारंवार चार्‍या बंद करणे, सुरू करणे हे प्रकार झाले. काही ठिकाणी तर वादही झाले.

त्यात कालव्याला पाणी कमी जास्त होते. त्याचाही परिणाम झाला. या प्रकारामुळे पुणतांबा परिसरातील अनेक बंधारे मात्र कोरडे राहिले. चालू वर्षाचा पावसाळा संपलेला आहे. पुरेशा पावसाअभावी आतापासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जून 2024 पर्यंतची स्थिती तर आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. बंधारे कोरडे राहिल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप असून याचा जाब ते येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या निमिताने राजकीय नेत्यांना तर विचारणार आहेत त्याचबरोबर अधिकारी वर्गालासुद्धा धारेवर धरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या