नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जमीन खरेदी-विक्रीत एजटंगरी करत ‘कमिशनबेस्ड’ पैशांवर मजा मारतांना उपनगर भागात महिलेवर गोळीबार (Firing) करुन पसार झालेल्या बेद गँगचा सूत्रधार बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे यास पकडण्यात गुंडाविरोधी पथकाला यश आले आहे. वाकुडेच्या एका मैत्रिणीने पोलिसांना (Police) ‘टीप’ दिल्यावर ही कारवाई झाली. तो पुण्यातील लोणीकंद येथील हॉटेलात मद्य पिण्यासाठी पोहोचला असता त्याला पोलीस आल्याचा अंदाज आल्याने पळ काढला. मात्र, पथकाने त्याचा पाठलाग करुन गजाआड केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे (वय ३४, रा. उपनगर, नाशिक) असे सराईताचे नाव आहे. २ फेब्रुवारी रोजी बरखा उज्जेनवाल यांच्यावर फर्नांडीसवाडी परिसरात मोक्का टोळीतील मयूर बेद गँगचा ऑपरेटर संशयित मयूर बेद, संजय बेद, टक्कू उर्फ सनी पगारे, बारक्या वाकूडे, इर्षाद चौधरी, दीपक चाट्या व गौरव गांडले यांनी बरखा यांना गाठून मुलगा राहुल याची माहिती विचारुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर मागील भांडणाची कुरापत काढून पिस्तूलातून (Gun) दोन राऊंड फायर केले.
मात्र, बरखा यांनी गोळी चुकविली असता, त्याचवेळी तिसऱ्या गोळीच्या फायरिंगवेळी वाकडेचे पिस्तूल ‘लॉक’ झाले. त्यामुळे बरखा यांचा जीव वाचला होता. यानंतर परिसरात लोकांची गर्दी झाल्याने वाकडे व इतर संशयित पळून गेले. यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर संशयितांना पकडण्यात आले होते. मात्र, वाकुडे तेव्हापासून फरार होता. तरीही तो चोरुन लपून नाशिकरोडला येऊन दहशत करुन पळून जात होता. त्यामुळे आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी वाकुडेला अटक करण्यासाठी ‘टास्क’ दिला.
त्याचवेळी मोक्काच्या गंभीर गुन्ह्यातील फरार बारक्या हा गोवा, उज्जैन, गुजरात येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. तर, (दि. २८) पथकाचे हवालदार विजय सूर्यवंशी व पोलीस नाईक प्रदीप ठाकरे वाकुडेच्या मैत्रिणीकडून महत्त्वाची माहिती समजली. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, हवालदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत व प्रवीण चव्हाण पुण्यात (Pune) दाखल झाले व त्यांनी वाकुडेला सिनेस्टाईल ताब्यात घेतले. त्याचा ताबा उपनगर पोलीसांकडे देण्यात आला आहे.
वेशांतर अन् घरझडती
पथक हडपसर परिसरात गेले. त्यांनी आपली ओळख पटू न देता वेशांतर आणि पेहराव बदलून स्थानिकांकसह तेथील काही गुन्हेगारांकडून वाकुडेची मागिती घेतली. तेव्हा तो हडपसर, लोणीकंद, कटकेवाडी परिसरात येत असल्याचे कळाले. त्यानुसार पथकाने त्याच्यावर दिवसरात्र नजर ठेवली. तेव्हा वाकुडे हा (दि. २९) कटकेवाडी येथे मद्य पिण्यासाठी आला. त्याला पोलीसांचा अंदाज आल्याने त्याने पळ काढला, मात्र पथकाने त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. यानंतर चौकशीत त्याने पुण्यातील मित्राच्या घरी राहत असल्याचे सांगून घर दाखविले. पथक त्या घरात गेले आणि झडती घेतली.