Friday, May 3, 2024
Homeनाशिकदहावी, बारावीत ‘नापास’ शेरा नाही; अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’चा...

दहावी, बारावीत ‘नापास’ शेरा नाही; अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’चा उल्लेख

नाशिक । प्रतिनिधी

दहावी, बारावीच्या परीक्षा आयुष्याला वळण देणारा मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा नापास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने ‘कौशल्य सेतू’ कार्यक्रम योजना राबवण्यास मान्यता दिली आहे.

- Advertisement -

त्यानुसार दहावी, बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण (पास) न होऊ शकणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण (नापास) शेरा न मारता ‘कौशल्य विकासास पात्र’ असे नमूद करण्यात येणार आहे. राज्य सरकारने क्रीडा व शालेय शिक्षण विभागाला याबाबत सूचना दिल्या असून नापास होणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेची राज्यस्तरीय अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेमार्फत करण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

त्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत कौशल्य विकास व उद्योजकता, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवस्तरावरील अधिकार्‍यांचा समावेश राहणार आहे. कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्याहून अधिक विषयात अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी संबंधित विद्यार्थ्याने स्वतःहून नोंदणी करणे आवश्यक आहे.

या नोंदणीसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आलेले परीक्षा प्रवेशपत्र किंवा विद्यार्थी अनुत्तीर्ण असलेली गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास सोसायटी, राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदअंतर्गत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण संस्था निवडता येतील. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची प्रशिक्षण वर्गातील किमान 75 टक्के उपस्थिती असल्यास तो / ती मूल्यमापनास पात्र राहिला. मूल्यमापनानंतर यशस्वी उमेदवारांना त्यांनी निवड केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण मंडळ किंवा व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांचेमार्फत प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.

’कौशल्य सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस्चा लाभ देण्याबाबत शिक्षण मंडळाचे नियम लागू असतील. भाषा विषय वगळता अन्य कोणत्याही विषयांऐवजी स्किल कोर्स केल्यावर या विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस्चा लाभ घेता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या