Saturday, May 4, 2024
Homeनाशिकवनौषधींसाठी प्रसिद्ध बॉटॅनिकल गार्डन

वनौषधींसाठी प्रसिद्ध बॉटॅनिकल गार्डन

नवीन नाशिक । निशिकांत पाटील
नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर असलेले पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान हे त्यामध्ये असलेल्या हजारो जातींच्या वनौषधी व आयुर्वेदिक औषधांच्या झाडांनी नुसतेच नाशिकमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या गुणकारक वनौषधी तथा आयुर्वेदिक औषधींची माहिती ‘देशदूत’शी बोलताना येथील अधिकार्‍यांनी दिली.

पं. जवाहरलाल नेहरू उद्यान नाशिककरांसाठी बॉटनिकल गार्डन म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. या उद्यानाचा विकास झाला आणि या ठिकाणी शहरातूनच नव्हे तर राज्यभरातून येणार्‍या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या उद्यानात वनौषधी तसेच आयुर्वेदिक औषधी यांच्यासह मूळच्या भारतातील नसलेल्या परंतु इकडेच रुळलेल्या विदेशी वनस्पतीदेखील आहेत. त्यासोबतच द्राक्ष ते रूद्राक्ष फळ संस्कृती जोपासणारी फळ वृक्षांचीदेखील लागवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

या ठिकाणी कपिला, शिवण, कुचलाकाजरा, रूद्राक्ष, द्राक्ष, सीताफळ, केसरी, मोह, कवट, तेंदू, हिरडा, आवळा, रामफळ, हनुमान फळ, फणस, जांभूळ, आंबा, काजू, बिब्बा आदी शेकडो प्रकारची फळझाडे आहेत.

नाशिक जिल्ह्यातील वन्य प्रदेशात तसेच इतर क्षेत्रात लक्षणीय ठरतील अशा सपुष्प वनस्पतींची संख्या हजाराहून अधिक आहे. त्यापैकी काही स्थानिक प्रजाती उद्यानातील कुसुमाकर, अशोक वन, चंपक वन व मकरंद वन या विभागात संवर्धित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पांढरा सिरस, बहवा, काटे साबर, नागकेसर, पळस, धामण, सातवीणा, अशोक, सीतेचा अशोक, झारूल, करंज, वारस, सोनचाफा, कदंब, बोंडारा, पांढरा चाफा, कांचन, शिरीष, पागारा आदी विविध प्रकारचे पुष्प-वृक्षवल्ली संवर्धित करण्यात आली आहे.

या ठिकाणी छोट्या-मोठ्या पक्ष्यांसाठी आवडते फळ खाद्य देणार्‍या वनस्पतींचे वन ‘सारिका बाग’ या नावाने संवर्धित करण्यात आले आहे. यामध्ये बोर, चिंच, उंबर, वड, मनीकरा, सिंगापूर चेरी, पेरू, डाळिंब, तोरण, घाणेरी, असाना, आळू, करवंद, भुवकेश, विलायती चिंच आदी प्रकारची शेकडो फळझाडे लावण्यात आल्याने पक्ष्यांचा चिवचिवाट या ठिकाणी सदैव ऐकायला मिळतो.

सह्याद्री श्रेणीतील डोंगर रांगा व संलग्न परिसरात आढळणारी बहुमोल औषधी वनस्पती या ठिकाणी लागवड करण्यात आल्या आहेत. शरीरातील विविध व्याधी कमी करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी या वनौषधींची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागवड केल्याने राज्यभरातून बरेच जण या ठिकाणी येथील दशमुळी नेण्यासाठी येतात. यामध्ये बेल-बिल्व, शिवण-काश्मिरी, पाडळ, टेटू, श्वोनक, टाकळी-ऐरण, अग्निमंथ, पीठवण-पृश्नपर्णी, सालवण, चिंचार्डी-बृहत, भुई रंगणी-कंटकारी, गोखरू आदी प्रजाती या ठिकाणी आढळून येतात.

या ठिकाणी आराध्य वृक्ष रूद्राक्ष, वड, उंबर, बेल, कदंब, कैलासपती, चंदन, पिंपळ, अश्वत्थ, आंबा, अंजरी, डाळिंब, खजूर, साधा चाफा, ऑलिव्ह, सिडार, ओक, सोनपिंपळ, बदाम, आपटा, कांचन, पचनार, काटे सावर, बखुल, साल आदी हजारो प्रजातींचे वृक्ष आढळून येतात.

पूर्वी नाशकातून भरकटलेले बिबटे वनविभागामार्फत पकडण्यात आल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरू उद्यान येथे काही दिवस मुक्कामासाठी येत होते. मात्र आता बॉटनिकल गार्डनची निर्मिती झाल्यानंतर आता पकडलेले बिबटे या ठिकाणी येत नाहीत. मात्र वनौषधी तसेच त्यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या