Friday, May 3, 2024
HomeUncategorized‘वाडा’ची फक्त बंदी पुरेशी ?

‘वाडा’ची फक्त बंदी पुरेशी ?

ऑलिम्पिक स्पर्धा उत्तेजक द्रव्यांच्या विळख्यात सापडली आहे. या कारणावरून अलीकडेच ‘वाडा’ने चार वर्षांची बंदी घातल्याने रशियाचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. ही कारवाई पुरेशी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

चिन्मय प्रभू

- Advertisement -

उत्तेजक  द्रव्य सेवनाचा ठपका ठेवत वाडाने रशियावर चार वर्षांची बंदी घातली. यामुळे रशियाचे खेळाडू 2020 मधल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि 2022 मध्ये कतारमध्ये होणार्‍या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. वाडाच्या या निर्णयानंतर रशियासह जागतिक क्रीडाजगतात खळबळ माजली. तथापि या बंदीमुळे खेळाडू उत्तेजक द्रव्यांपासून परावृत्त होऊ शकतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका अर्थाने हा क्रीडाक्षेत्रातल्या रशियाच्या अस्तित्वावरचाच घाला आहे. अर्थात कायदा म्हटला की पळवाटा आल्याच. त्यानुसार उत्तेजक द्रव्य  न घेणारे किंवा या चाचणीदरम्यान निर्दोष आढळणारे रशियन खेळाडू तटस्थ म्हणून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे या बंदीनंतरही रशियन खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. पियाँगचँगमधल्या हिवाळी ऑलिम्पिक दरम्यानही रशियावर अशीच बंदी घालण्यात आली होती. मात्र रशियन खेळाडू या स्पर्धेत तटस्थ म्हणून सहभागी झाले होते. शिवाय त्यांनी 17 पदकेही जिंकली. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये तटस्थपणे सहभागी होण्यासाठी रशियाचे खेळाडू नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.  याशिवाय युरो 2020, फुटबॉल विश्वचषक पात्रता सामने, फॉर्म्युला वनची सोची ग्रँड प्रिक्स स्पर्धा या बंदीअंतर्गत येत नसल्यामुळे रशियन खेळाडू यात सहभागी होऊ शकतील. याच कारणामुळे या बंदीच्या परिणामकारकतेपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, वाडाच्या या निर्णयाबाबत क्रीडाविश्वातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे समर्थन केले आहे तर काहींना ही बंदी फारशी प्रभावी वाटत नाही. या बंदीमुळे काहीच परिणाम नाही आणि रशियामध्ये राजरोजसपणे सुरू असणारे उत्तेजक द्रव्यसेवनाचे प्रकार सुरू राहतील, असे काही क्रीडा प्रतिनिधींचे मत आहे. युनायटेड किंग्डमची उत्तेजक द्रव्यविरोधी संस्था यूकॅडने या बंदीचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते ही योग्य शिक्षा आहे. यामुळे उत्तेजक द्रव्य घेणार्‍या खेळाडूंना जरब बसेल आणि प्रामाणिक, निर्दोष रशियन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील. या बंदीमुळे कोणाच्याही हक्कांवर गदा येणार नाही, असे यूकॅडचे म्हणणे आहे. अमेरिकन उत्तेजक द्रव्यविरोधी संस्था तसेच खेळाडूंच्या काही प्रतिनिधींनी ही बंदी अर्थहीन आणि गुळमुळीत असल्याचे मत मांडले आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या नेतृत्त्वावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा प्रभाव असल्यामुळे वाडाने रशियाच्या खेळाडूंना पळवाट उपलब्ध करून दिल्याचा त्यांचा आरोप आहे. आपल्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी रशियावर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मात्र यामुळे प्रामाणिक खेळाडूंवर अन्याय होईल, अशीही काहीजणांची भावना आहे.

रशियातल्या खेळांमध्ये सर्रास होणारा उत्तेजक द्रव्यांचा वापर लपून राहिलेला नाही. पण खेळाडूंचे उत्तेजक द्रव्यसेवन रशियाने कधीच गांभीर्याने घेतलेले नाही. या कृत्याला त्या देशातल्या प्रशासकांचाच पाठिंबा असल्याचे दिसून येते. रशियाने 2019 च्या जानेवारीमध्ये वाडाला देशातल्या शासकीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळेतल्या चाचण्यांचा अहवाल दिला होता. ही प्रयोगशाळा रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आहे. मात्र हा अहवाल चुकीचा असून त्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचे वाडाचे म्हणणे होते. वाडाला चुकीचे अहवाल सादर करण्यात आल्याचा आरोप रशियावर आहे. याच कारणामुळे ऑलिम्पिक समितीने 2015 मध्ये रशियन उत्तेजक प्रतिबंधक संस्थेला बेदखल करण्याचा निर्णय घेतला होता. आता वाडाच्या या निर्णयामुळे रशियातले उत्तेजक द्रव्यांचे गौडबंगाल समोर आले आहे.

तिकडे हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा रशियाचा आरोप आहे. उत्तेजक द्रव्यांमुळे ऑलिम्पिकमध्ये बंदीला सामोरे जाणारा रशिया हा पहिलाच देश आहे. याआधी जागतिक महायुद्धाच्या काळात ऑस्ट्रिया, बुल्गारिया, टर्की, हंगेरी, जपान आणि जर्मनी या देशांवर बंदी घालण्यात आली होती. वर्णद्वेषामुळे दक्षिण आफ्रिकेवर काही वर्षे बंदी होती तर तालिबानी अत्याचारांमुळे अफगाणिस्तानवर बंदी घालण्यात आली होती. मात्र उत्तेजक द्रव्यांमुळे घालण्यात आलेल्या बंदीचे हे पहिलेच प्रकरण असल्यामुळे अशा निर्बंधा

ंमुळे उत्तेजक द्रव्यांची कीड नष्ट व्हायला मदत होईल का, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाची उत्तरे येत्या काळात मिळतीलच. मात्र हे गैरप्रकार थांबवण्यासाठी वाडा तसेच सर्वच आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थांनी कठोर पावले उचलण्याची आणि कडक नियम करण्याची गरज आहे हेच खरे.

- Advertisment -

ताज्या बातम्या