Saturday, May 4, 2024
Homeनगरश्रीरामपूर पालिकेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत गायब

श्रीरामपूर पालिकेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत गायब

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर नसतात, त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. अशा कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान नगरपरिषद संचालनायाने या तक्रारीची दखल घेवून याबाबत पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडे अहवाल मागितला आहे.

नगराध्यक्षा आदिक यांनी दि. 27 डिसेंबर रोजी ही लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपालिकेचे अनेक कर्मचारी, अधिकारी हे कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपलब्द नसतात, त्यामुळे पालिकेत काम घेवून आलेल्या नागरिकांना विनाकारण चकरा माराव्या लागतात.

- Advertisement -

पालिकेत हजेरीसाठी बायोमॅट्रीक प्रणाली आल्यामुळे पालिका कर्मचारी व अधिकारी सकाळी कामावर रुजू होण्यापूर्वी थम दिल्यानंतर गायब होतात. ते दिवसभर कार्यालयात नसल्याने नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. पालिका कर्मचार्‍यांचे पगार शासनामार्फत सरळ कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग होतात. त्यामुळे सदर कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही, असेही नगराध्यक्षा आदिक यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

तरी या कर्मचार्‍यांवर आपल्या स्तरवार कडक कारवाई करावी, जेणेकरून नगरपरिषदेच्या कामकाजाला शिस्त लागेल, व कर्मचार्‍यांची गैरसोय दूर होईल, असे या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या तक्रारीची दखल घेवून नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे सहायक संचालक अभिषेक पराडकर यांच्या सहीने पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना या तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीदर्शक अहवाल येत्या 10 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या