Friday, May 3, 2024
Homeनाशिकगंगापूर येथील सरस्वती बचत गटाने १६ तास काम करून बनवले साडे आठ...

गंगापूर येथील सरस्वती बचत गटाने १६ तास काम करून बनवले साडे आठ हजार मास्क

नाशिक : करोना संसर्गामुळे संपूर्ण जगात व आपल्या देशातही लॉकडाऊन करावे लागले, त्याचा फटका शेती आणि मोठमोठ्या उद्योगधंद्यांसह अनेक लघु उद्योगांनाही बसला आहे. अनेकांच्या रोजगारांवर परिणाम झाला. रोजंदारीने काम करणाऱ्या आमच्या सारख्या असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.

अशातच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व बचत गटांना जास्तीत जास्त मास्कची निर्मिती करून ग्रामस्तरावर विक्री करण्याचे आवाहन करून आशेचा किरण दाखविला. सगळीकडे नैराश्याचे वातावरण असतानाही आमच्या हाताला काम मिळाल्यामुळे आम्ही मोठ्या उमेदीने मास्क तयार करीत असून आतापर्यंत साडे आठ हजार मास्कची विक्री केल्याचे गोवर्धन, ता.जि.नाशिक येथील सरस्वती बचत गटाच्या अध्यक्षा देवयानी पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरस्वती महिला स्वयंसहायता बचत गटाने एकूण साडे आठ हजार मास्क तयार करून त्याची विक्री केली आहे.

करोनाच्या संकटामुळे गावोगावी पुरुष मंडळींच्या हाताला काम नाही. त्यामुळे घराघरांतील महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशातच श्रीमती बनसोडे यांनी पंचायत समितीचे तालुका अभियान व्यवस्थापक स्वप्निल शिर्के यांच्यामार्फत सदस्यांना मास्क बनविण्याचे आवाहन केल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.

वर्क फ्रॉम होम, सोशल डिस्टन्सिंगचे पालन

सरस्वती बचत गटाच्या अध्यक्षा देवयानी पाटील यांनी सांगितले की, मास्क बनविण्यासाठी लागणारी शिलाई मशिन आमच्या प्रत्येकीकडे नसल्याने आम्ही इतरही बचतगटाच्या महिलांना एकत्र केले व प्रत्येकीने स्वत:च्या घरी राहूनच म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ काम केले. अगदी कमी वेळेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून आम्ही हे काम पूर्ण केले. घरातील सर्व कामे आवरून दिवसांत १६ तास काम करून साडे आठ हजारांचे टार्गेट पूर्ण केले आहे. यात आमच्या गटासह इतरही गटाच्या महिलांचे योगदान आहे.

मास्क विक्रीचे नियोजन

गंगावरे ग्रामपंचायतीला ३ हजार, गोवर्धन ग्रामपंचायतीला ३ हजार, नागंलवाडी गावाला १ हजार ५०, रासेगाव व ओढा गावाला प्रत्येकी २०० तर आरोग्य विभागाला ५०० आणि गोवर्धन गावात ५०० मास्कची विक्री करण्यात आली आहे. यातून मिळालेल्या उत्पन्नातून आम्हा सगळ्या महिलांच्या घर खर्चाला हातभार लागल्याचे देवयानी पाटील यांनी सांगितले.

लीना बनसोड यांनी भरले पंखात बळ

करोनाच्या संकट त्यात हाताला काम नसल्याने श्रीमती बनसोडे यांनी गावातील सर्व महिला बचतगटांना मास्क तयार करण्याचे काम देवून आमच्यासारख्या निराश झालेल्या महिलांच्या पंखात बळ भरल्याची भावना बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केली. तसेच ग्रामस्तरावर मास्क बनविण्याच्या कल्पनेमुळे गावागावात करोना आजारा विषयीची जनजागृतीही झाली व गाव पातळीवर अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्या माध्यमातून मास्कचे महत्त्व कळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या