Saturday, May 4, 2024
Homeनाशिकदेवळा : वाजगावला मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; चार दिवस कडकडीत...

देवळा : वाजगावला मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; चार दिवस कडकडीत बंद

वाजगाव । शुभानंद देवरे

देवळा तालुक्यातील वाजगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूचना देऊनही नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर वाजगाव ग्रामपंचायतीने आता कडक पाऊल उचलले असून नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.

- Advertisement -

देवळा तालुक्यालगत असलेल्या मालेगाव तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे  खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील अनेक गावात युवकांनी पुढाकार घेऊन गावात प्रवेश करण्याचे मार्गावर अडथळे निर्माण करून नाकेबंदी केली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांना तसेच नागरीकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांच्या मदतीने वाजगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कोरोनाचा संसर्ग होण्यास कारण ठरणाऱ्या गावठी दारूच्या भट्टया उध्वस्त करत कोरोनाशी युध्द करण्यास ग्रामपंचायत प्रशासन सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. यानंतर बाहेरगावाहून तसेच कंटेनमेंट झोनमधून गावात राहण्यासाठी येणारे नागरीक, अनोळखी नागरीकांचा गावात होणारा संचार, तसेच गावातीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानात वाढू लागलेली गर्दी, सोशल डिस्टंशींगचे होणारे उल्लंघन, मास्क न वापरणे आदींमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नागरीक ग्रामपंचायत प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले.

ग्रामपंचायतीने याची गंभार दखल घेत सरपंच प्रकाश मोहन, उपसरपंच दिपक देवरे, पोलीस पाटील निशा देवरे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. कोरोनाविषयी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येऊन महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले. कंटेनमेंट झोनमधून आल्याची माहीती न देणाऱ्या नागरीकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.गावातील प्रवेश मार्गांवर बाहेरगावाहून येणाऱ्या  नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे. दि.१४  मे ते १७ मे ह्या कालावधित गावातील सर्व किराणा, भाजीपाला, पीठाची चक्की, मास विक्री आदी सर्वच दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी जे. व्हि. देवरे, आरोग्य विभागाचे प्रशांत सोनवणे, अमोल देवरे, गिरीश आहेर, यशवंत देवरे, रामचंद्र गवळी, विनोद देवरे, साहेबराव देवरे, सुनील देवरे, वैजनाथ देवरे, संदीप देवरे, आबा देवरे, शैलेंद्र देवरे, किरण नलगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असतांना अनेक ग्रामस्थ वारंवार सुचना देऊनही मास्कचा वापर करत नसल्यामुळे अशा व्यक्तींना १०० रू . दंड करण्यचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात येऊन मास्कचा वापर न करणाऱ्या पहिल्या दिवशी ३० व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या