Tuesday, May 14, 2024
Homeजळगावजळगाव : कोविड रुग्णालयातील ८० रुग्णांचे अहवाल गहाळ ; माजी मंत्री गिरीश...

जळगाव : कोविड रुग्णालयातील ८० रुग्णांचे अहवाल गहाळ ; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा गंभीर आरोप

कोविड रुग्णालय शहराबाहेर हलवा
जिल्हा कोविड रुग्णालयातील रुग्णांचे अहवाल १२ ते १३ दिवस उलटूनही मिळत नाहीत. अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. अहवालाच्या प्रतीक्षेतील क्वारंटाइन, संशयित रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. ठोस, प्रभावी उपाययोजनांसाठी शासन, प्रशासनामध्ये समन्वय दिसत नाही. जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहे.

तर इतर आजारांच्या रुग्णांसाठी जळगाव शहराबाहेरील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या सर्वसामान्य, गरीब रुग्णांना शहराबाहेरील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जावे लागते. हे रुग्णालय जळगाव शहरापासून लांब असल्याने त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी गरीब आणि गंभीर स्थितीतील रुग्णांचे खूप हाल होतात. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी शहराबाहेरील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय पूर्णपणे अधिग्रहीत करण्यात यावे आणि जिल्हा रुग्णालयात पूर्वीप्रमाणेच कोरोना व्यतिरिक्त इतर सर्व रुग्णांवर उपचार व्हावेत. या ठिकाणी इतर तपासण्या, सोयीसुविधा देखील गरीब, गरजू रुग्णांना चांगल्या प्रकारे आणि तत्काळ मिळू शकतील, असा सल्ला माजी मंत्री महाजन यांनी दिला आहे.

- Advertisement -

शासकीय यंत्रणा अपयशी
कोरोनासंदर्भातील रुग्णांना ने-आण करण्यासाठी नवीन ऍम्ब्युलन्सची सुविधा नाही. जिल्ह्यात ज्या ऍम्ब्युलन्स अगोदरपासून कार्यान्वित आहेत, त्यांचाच वापर सध्या कोरोनासंदर्भातील रुग्णांसाठी होत आहे. फक्त इकडची ऍम्ब्युलन्स तिकडे आणि तिकडची ऍम्ब्युलन्स इकडे केल्याचे आरोग्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत दाखवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. असे प्रयोग म्हणेज निव्वळ थातूर मातूर उपचार आहेत. संबंधित रुग्णांना ऍम्ब्युलन्सच्या प्रतीक्षेत १० ते १२ तास ताटकळत बसून रहावे लागते, ही शोकांतिका आहे.

त्यामुळे कोरोनाबाबतची शासकीय यंत्रणा अपयश ठरतेय. आता तर पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने आरोग्य विषयक समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देवून त्या तत्काळ सोडवण्यात याव्यात. या अगोदरचा आमचा काही अनुभव लक्षात घेता आम्हाला विश्‍वासात घेवून काम व्हावे. परंतु, शासन त्यांच्याच अविर्भावात काम करीत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तर मृत्यूदरही वाढत असल्याची खंत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या