Saturday, May 4, 2024
Homeनगरट्रक-दुचाकी धडकेत महिला ठार

ट्रक-दुचाकी धडकेत महिला ठार

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील केडगाव बायपासजवळ ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील मनीषा बाळासाहेब कापरे (वय-35 रा. केडगाव) ही महिला जागीच ठार झाली. दुचाकीवरील दुसरी महिला रेखा प्रशांत चव्हाण (वय- 32) ही गंभीर जखमी झाली आहे. केडगाव बायपास रोडवर सोनेवाडी चौकात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला. अपघातातील महिला बहिणी असल्याचे सांगण्यात आले.

केडगाव बायपासजवळ गुरुवारी सकाळी मालट्रक (एनटी-52 एफ-6085) सोलापूर येथून नगरला येत होता. तर, दुचाकीवरील (एमएच-16, एएल-8352) महिला नगरहून अकोळनेरकडे चालल्या होत्या. यावेळी ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवर असलेली महिला मनीषा कापरे जागीच ठार झाल्या. रेखा चव्हाण गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले.

- Advertisement -

याप्रकरणी बाबासाहेब साहेबराव गारुडकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे, सहायक निरीक्षक हेमंत भंगाळे, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ अन्य कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक हेमंत भंगाळे करीत आहेत.
.

- Advertisment -

ताज्या बातम्या