Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedगुरुविण नाही दुजा आधार !

गुरुविण नाही दुजा आधार !

नाशिक : आज गुरुपौर्णिमा! आज सगळे आपापल्या गुरूंचे पूजन करतात. आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक व्यक्ती भेटत असतात. काही ना काही देऊन जात असतात. त्या अर्थाने त्या आपल्या गुरुस्थानी असतात. त्यांच्यामुळे आपले आयुष्य समृद्ध होते.

शालेय वयात शिक्षक आपले गुरु असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आवडत्या बाईंना किंवा सरांना फुले देऊन त्यांचे आशीर्वाद घेताना विद्यार्थ्यांचे चेहरे कसे आनंदाने फुलून येतात याचा सुखद अनुभव आपणही विद्यार्थी दशेत घेतला आहे आणि आपल्या मुलांच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा घेत असतो. तथापि जन्मापासून आयुष्याच्या सध्याच्या टप्यापर्यंत आपल्या संपर्कात अनेक व्यक्ती येत असतात. घटना घडत असतात. ज्यातून आपण काहीतरी शिकत असतो. एक व्यक्ती, एक माणूस म्हणून आपण समृद्ध होत असतो. या अर्थाने आपण सगळे आयुष्यभर विद्यार्थीच असतो. जाणते-अजाणतेपणी आपल्याला काहीतरी शिकवण देणाऱ्या अशा सगळ्या व्यक्ती, घटना या आपल्याला गुरुस्थानीच असतात. ज्यांचा आपल्या आयुष्यावर अमीट ठसा उमटत असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करायला हवे. असे कोणाकोणाचे ठसे उमटतात?

- Advertisement -

असाच अनुभव प्रसिद्ध सराफ व इतिहासाचे अभ्यासक गिरीश टकले यांचा आहे. ते म्हणतात, माणूस प्रथम आपल्या पित्याकडूनच शिकत असतो. वडिलांनी दिलेली शिकवण अंमलात आणण्यासाठीची अंतःप्रेरणा मुलाला आपसूकच मिळत असते. माझ्या व्यक्तिमत्वावर माझे वडील सदाशिव टकले आणि माझे काका प्रभाकर टकले यांच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे. आमच्या व्यवसायाचे उदाहरण सांगतो. माझे वडील चौदा वर्षांचे असतांना आमच्या काकांनी त्यांना सराफी दुकान टाकून दिले. त्याचाच आज विस्तार झाला आहे. त्यांनी दिलेली पहिली शिकवण : दुकानात काउंटरवर बसणाऱ्याने कधीही काहीही वाचत बसू नये. अशाने दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकाकडे दुर्लक्ष होते.

दुसरी शिकवण : व्यवसायाच्या ठिकाणाला-दुकानाला कधीही मित्रांच्या गप्पांचा अड्डा बनवू नये. त्यांच्या दृष्टीने या साध्या गोष्टी होत्या, पण मी व माझ्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने हे व्यवसायाचे तत्वज्ञान आहे. ज्याचे महत्व क्षणोक्षणी अनुभवाला येत असते. अशा कितीतरी गोष्टी येतील.

आयुष्याच्या वाटचालीत माणूस काही गोष्टी इतरांकडून आपसूक शिकत असतो. तर काही गोष्टी त्याला जाणीवपूर्वक शिकायच्या असतात. यासाठी त्या त्या क्षेत्रातील गुरूंचा शोध अशी माणसे सतत घेत असतात. योग्य गुरु लाभले तर शिकणेही निरंतर आनंदाचे होते. त्या शिकण्याला वयाचे, परिस्थितीचे बंधन नसते. ध्येय साध्य झाल्यानंतर आयुष्य परिपूर्ण झाले अशी भावना निर्माण होत असते.

नाशिकचे तबलावादक नितीन वारे त्यांच्या परिपूर्ण भावनेचा प्रवास सांगताना म्हणाले, काही काळ तबला शिकल्यानंतर मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली होती. अर्थात माझेही शिकणे सुरूच होते. पण माझे पारंपरिक अध्ययन झालेले नव्हते. उस्ताद अहमद जान थिरकवाँ हे तबल्यातील गौरीशंकरच! त्यांचा शुद्ध तबला शिकण्याचा ध्यास मला लागला होता. मी गुरु शोधत होतो. माझी आणि थिरकवाँ यांचा शुद्ध तबला वाजवणाऱ्या पंडित नारायण जोशी यांची २००३ साली भेट झाली. ते नाशिकला राहायला आले होते. मी त्यांच्या सेवेत रुजू झालो. त्यांनी मला आपले शिष्य बनवावे आणि थिरकवाँ यांचा शुद्ध तबला मला शिकवावा अशी माझी इच्छा होती. पण त्यासाठी मला ४ वर्षे वाट पाहावी लागली. २००७ साली ‘ तुला आता काहीतरी शिकवावेसे वाटते. पण त्यासाठी तुझ्या डोक्यातील आतापर्यंत शिकलेला तबला काढून टाकून कोऱ्या पाटीसारखे तुला माझ्यासमोर बसावे लागेल. माझी तयारी होतीच. त्यांनी मला रुबरु संथा दिली. त्यांच्या सेवेची आणि त्यांच्याकडून शुद्ध तबला शिकण्याचे भाग्य मला २०१७ लाभले. त्यानंतर माझे विचार, वागणे, तबल्याची बैठक, वाजवण्याची पद्धत असे सारे काही बदलले. हा ठसा न पुसणारा आहे. त्यांचा मी आजन्म ऋणी आहे.

आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर समर्थ गुरु लाभले तर आपल्या जीवनाचे सोने होते. एक व्यक्ती आणि माणूस म्हणून आपला विकास होतो. मूल्यांची रुजवण होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या