Saturday, May 4, 2024
Homeनाशिकरानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा : कृषीमंत्री दादा भुसे

रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा : कृषीमंत्री दादा भुसे

नाशिक । प्रतिनिधी

रानमेवा व रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपवणूक व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केले. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, आमदार सरोज आहेर, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार हेमंत टकले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षक प्राचार्य संजय पाटील, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, उपसंचालक कैलास शिरसाठ, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, दिलीप देवरे, कैलास खैरनार, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, आदिवासी शेतकरी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने या शुभदिनी कृषी विभागामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रमुख शहरांमध्ये हा रानभाज्या महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे असेलेले महत्व अधोरेखित होणार आहे. रानभाज्या ही निसर्गाची देणगी असून कोणतेही रासायनिक खत किंवा मशागतीशिवाय त्या उगवतात. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या रोगाशी सामना करण्यासाठी शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढविणे व टिकविणे खुप गरजेचे आहे.

या रानभाज्या प्रथिने, पोषणद्रव्य, व जीवनसत्वयुक्त असून इम्युनिटी बुस्टर म्हणून यांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे रानभाज्यांना एक व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीतही शेतकरी राजाने अन्नधान्य, दुध व भाजीपाला यांचा पुरवठा कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण न करता केला आहे. संपूर्ण देशात बळीराजा या कार्यात कायमच अग्रेसर राहीला आहे. त्याचे हे योगदान खुप मोठे आहे.

कृषी विभागाने या रानभाज्या महोत्सवाचे नियोजन अत्यंत कमी वेळात केले हे कौतुकास्पद आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेतुन गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल यातून शेतकरी स्वत: आपल्या शेतमालाचे ब्रँडींग करू शकल्याने शेतीमालाला चांगला दर मिळेल. गट माध्यम व संस्था यांच्या माध्यमातून या रानभाज्यांच्या विक्रीसाठी शहरांमध्ये कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल.

या योजनेतून शेतीमालाला गोडाऊन, स्टोअरेज, कोल्ड स्टोअरेज देखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, कृषी विभागाला शेतकरी व समाज यांना जोडण्याची चांगली संधी कृषी विभागाने या महोत्सवाचे आयोजन करून दिली आहे. आदिवासी बांधवांच्या रानभाज्या जनतेपर्यंत पोहविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आगामी काळात शहरातील कृषी विभाग व शासनाच्या उपलब्ध जागांमध्ये कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

आज या महोत्सवात जवळपास ३६७ रानभाज्यांचे प्रकार उपलब्ध आहेत व हा ठेवा आपणास जपायचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या रानभाज्यांच्या पाककृती यु ट्यूब सारख्या माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी सभापती संजय बनकर, माजी आमदार हेमंत टकले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात कृषीमंत्री भुसे यांच्या हस्ते विमल आचारी, मारूती पवार, मधुकर बांगारे, मनोहर चौधरी, सिताराम चौधरी, अनिल पवार तसेच आदर्श शेती शेतकरी गट या शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच के.के. वाघ उद्यान महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी चोथे यांचा देखील यावेळी कृषिमंत्र्यांनी गौरव केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या