Saturday, May 4, 2024
Homeनगरखेळांमधून तरुणांना करिअरच्या मोठ्या संधी - अंजली भागवत

खेळांमधून तरुणांना करिअरच्या मोठ्या संधी – अंजली भागवत

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

स्पर्धेच्या युगात प्रत्येक तरुण हा यशाच्या मागे धावत असतो. विविध क्षेत्रांबरोबर क्रिडा हे मोठे क्षेत्र

- Advertisement -

असून खेळ व मैदान याकडे करिअर म्हणून पाहत जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर खेळामधून करिअरच्या मोठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या नेमबाज पद्मश्री अंजली भागवत यांनी व्यक्त केले आहे.

जयहिंद लोक चळवळीच्यावतीने आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समध्ये क्रीडा या परिसंवादात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत लक्ष फाऊंडेशनचे विशाल चोरडिया, अमेरिकेतील क्रिडा समीक्षक केदार लेले, हवाई खेळपट्टू पद्मश्री शीतल महाजन, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पटू कमलेश मेहता, कविता राऊत, श्रध्दा घुले, पुजा राणी, अमेरिकेच्या फ्लोरिया नेहे यांनी सहभाग घेतला. यावेळी व्यासपीठावर जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. नामदेवराव गुंजाळ, समन्वयक उत्तमराव जगधने, संदीप खताळ यासह विविध पदाधिकारी होते.

अंजली भागवत म्हणाल्या, पूर्वीच्या काळी खेळाकडे करिअर म्हणून कोणी पहात नव्हते मात्र त्यावेळेस आपण आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले. नेमबाजी ऑलम्पिकमध्ये जाण्याचा प्रथम मान मिळवल्यानंतर या खेळाला लौकिक प्राप्त झाला. आजही तरुणांना खेळामध्ये खूप संधी असून प्रत्येकाने कुणाशी तुलना न करता स्वत:ची तुलना करावी.

स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, जिद्द व आत्मविश्वास असेल तर तुमच्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रिय पातळीवर तुम्हाला नेतृत्व करायचे असेल तर स्वत:मध्ये परिपूर्णता येण्यासाठी सातत्याने व निष्ठेने परिश्रम हाच त्यावर मूलमंत्र असल्याचे त्या म्हणाल्या.

पद्मश्री शीतल महाजन म्हणाल्या, हवाई खेळांमध्ये आजही ही अनेक तरुण सहभागी होत नाहीत. हे धाडसी खेळ आहेत. परंतु प्रत्येक खेळामध्ये आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. खेळामध्ये निर्णय क्षमता, अचूकता आणि समय सूचकता अत्यंत महत्त्वाची असून सर्व खेळांसाठी आता मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

याप्रसंगी कविता राऊत, श्रद्धा घुले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आ. डॉ. तांबे म्हणाले, आरोग्यासाठी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आरोग्याबरोबर बुद्धीचा विकास व्हायचा असेल तर शालेय जीवनामध्ये क्रिडा विषय अत्यावश्यकच आहेत . म्हणून खेळ आणि कला या विषयासांठी महाराष्ट्र शासनाने अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

यानंतर शेती व ग्रामीण विकास या विषयावर झालेल्या परिसंवादात आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार म्हणाले की, प्रत्येक गावामध्ये गाव गाडा असतो मात्र त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले आणि आधुनिकतेची जोड दिली तर गावेची गावे आदर्श निर्माण होतील. ग्रामस्वच्छता, आरोग्य व्यवस्था, शिक्षण यावर काम होणे गरजेचे आहे.

तर चंद्रकांत दळवी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये एक नव्हे तर अनेक आदर्श गावे निर्माण व्हावेत.जेणेकरून समृद्ध खेडी झाली तर देश समृद्ध होईल. यावेळी उत्तमराव जगधने व योगेश पाटील यांनीही शेती या विषयावरील चर्चासत्रात सहभाग घेतला.सूत्रसंचालन उत्कर्षा रुपवते यांनी केले तर डॉ. सुरज गवांदे, अशोक खैरनार यांनी आंतरराष्ट्रीय समन्वय करून मान्यवरांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या