Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपाणी पुरवठा योजनेची प्रतीक्षा

पाणी पुरवठा योजनेची प्रतीक्षा

सटाणा । दीपक सूर्यवंशी Satana

बागलाण तालुक्याच्या सीमेवरील जरमाळ किल्ल्याच्या मध्यावर वसलेल्या दोधनपाडा वस्तीवरील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतर आजही पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा किलोमीटर अंतर पायपिट करून शेवडीवरून (झरा) पाणी आणावे लागत असल्याने गेल्या सत्तर वर्षात शासनाच्या योजना गरीब आदीवासींपर्यंत पोहचवण्यात पुढार्‍यांसह शासकीय अधिकार्‍यांना अपयश आल्याचे सिद्ध होते.

- Advertisement -

तालुक्याच्या गावापासून चाळीस कि.मी.अंतरावर असलेल्या दोधनपाडा या आदिवासी वस्तीची लोकसंख्या साधारण चारशेच्या आसपास आहे. या वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने महिलांना अर्धा किमी अंतरावरुन पाणी वाहून आणावे लागते.पाणी आणण्यासाठीचा रस्ता चढउताराचा असल्यामुळे अनेक वेळा पाय घसरून पडल्यामुळे दुखापत झाल्याचे येथील महिलांनी सांगितले.

दिवसभर काम करून आल्यानंतर सायंकाळी पाणी भरण्यासाठी अंधारही होतो. जंगल परिसर असल्याने जंगली श्वापदांचा सामना नागरिकांना करावा लागतो.शासकीय स्तरावर अनेक वेळा पाणीपुरवठा योजनेची मागणी करूनही अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी या गावाला जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र तेही अपूर्णावस्थेत असल्याने चारचाकी वाहन घेऊन जाता येत नाही.

या रस्त्यावरील नाल्यांवर फरशी पुल बांधल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकते. या अपूर्ण रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.तसेच रस्त्याबरोबरच विजेचेही आगमन झाले आहे. वीज पोहचून गावाचा अंधार दूर झाला असला तरी आदीवासींच्या जीवनमानात प्रकाश पसरला नाही. वस्तीवरिल अनेक ग्रामस्थ प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेपासून वंचित आहेत. आजही ते पारंपरीक पाचटाच्या झोपडीत जीवन जगत आहेत. शंभर टक्के आदीवासी वस्ती असूनही घरकुल योजना राबवण्यात शासकीय अधिकारी कमी पडले आहेत.गावाला तात्काळ पाणीपुरवठा योजना सुरू करुन अपूर्ण असलेल्या रस्त्याचे आणि घरकुल योजनेचे काम मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी दोधनपाडा वस्तीवरील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ पाण्याची समस्या घेऊन भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या सर्व समस्यांची माहीती घेऊन या वस्तीसाठी लवकरच कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व घरकूल योजनेतून निवासाची व्यवस्था करण्यात येईल.

आमदार दिलीप बोरसे, बागलाण

- Advertisment -

ताज्या बातम्या