Saturday, May 4, 2024
Homeराजकीयभूमीगत वीज वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करा

भूमीगत वीज वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

वीज वितरण कंपनीने भूमीगत वीज वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करावे. भारनियमन होणार नाही याची काळजी घ्यावी.

- Advertisement -

विजेचा अवैधरीत्या वापर करणार्‍यांवर कारवाई करावी. आवश्यक तेथे पोलिस दलाची मदत घ्यावी, अशा सुचना खा. सुभाष भामरे यांनी दिल्या.

जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची (दिशा) सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. खा.डॉ.सुभाष भामरे हे अध्यक्षस्थानी होते. खा.डॉ.हीना गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, आ. मंजुळा गावित, आ. काशिराम पावरा, जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., आयुक्त अजिज शेख, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते.

पुढे बोलतांना खा. डॉ. भामरे म्हणाले, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून विविध योजनांची अंमलबजावणी करावी. वीज वितरण कंपनीने भूमीगत वीज वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करावे.

भारनियमन होणार नाही याची काळजी घ्यावी. विजेचा अवैधरीत्या वापर करणार्‍यांवर कारवाई करावी. आवश्यक तेथे पोलिस दलाची मदत घ्यावी. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच धुळे शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देत दोषींवर कारवाई करावी.

धुळे शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीने आपला प्रकल्प अहवाल सादर करावा. वेलनेस सेंटर या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ती यांच्यात समन्वय साधावा. जेणेकरून या योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करता येईल, असे खा. डॉ. गावित यांनी सांगितले.

यावेळी खा.डॉ.भामरे, डॉ.गावित यांनी राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आदिवासी विकास विभागाकडील केंद्र पुरस्कृत योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसह विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येईल.

या बैठकांच्या माध्यमातून समन्वयाने कामे केली जातील, असे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत खा. डॉ. गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.रंधे, आ. श्री.पावरा, धुळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, अशासकीय सदस्य सुनील बैसाणे, अनुप अग्रवाल आदींनी भाग घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन यांनी प्रास्ताविक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या