Tuesday, May 7, 2024
Homeअग्रलेखनितीशकुमारांच्या डोक्यावर काटेरी मुकूट

नितीशकुमारांच्या डोक्यावर काटेरी मुकूट

बिहारमध्ये एनडीएला काठावरचे का होईना, पण स्पष्ट बहुमत मिळाल्याने नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी केलेली राजकीय तडजोड पाहता, भाजपाने जदयूच्या कमी जागा असतानाही कोणतेही आढेवेढे न घेता नितीशकुमार यांच्या शिरावर मुख्यमंत्रिपदाचा काटेरी ताज सजविला. त्याचवेळी दोन उपमुख्यमंत्री करीत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार तयार करण्याची व्यवस्था केली. यातच भाजपाची दुरगामी रणनीती लक्षात येते.

भाजपाच्या या घडामोडी नितीशकुमारांच्या लक्षात आल्या नसतील? असे नव्हे. परंतु, त्यांची स्थिती आता इकडे आड तिकडे विहीर अशी आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना, त्यांनी हा काटेरी मुकुट स्वीकारला असावा. नितीशकुमारांना मुख्यमंत्री बनवितानाच भाजपाने सर्वात आधी त्यांचे पंख छाटले ते सुशीलकुमार मोदी यांच्या रुपाने. कारण बिहारच्या सत्ताकारणात या जोडीचा चांगलाच जम बसला होता. अनेकवेळा तर नितीशकुमारांना भाजपाचे धोरण आवडले नाही; तरी हे धोरण सुशीलकुमार त्यांच्या गळी उतरविण्यात यशस्वी होत असत. परंतु, तेव्हाची स्थिती वेगळी होती. कारण गरज नितीशकुमार यांना नव्हे तर भाजपाला होती आणि हे आव्हान पेलण्याची ताकद केवळ सुशील मोदी यांच्यातच होती.

- Advertisement -

आज परिस्थिती बदलली. ज्या जनता दल युनायटेडचा बिहारमध्ये बोलबाला होता; त्यांची स्थिती केविलवाणी झाली. त्याचवेळी भाजपाला अनपेक्षित यश मिळाले. खरे म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाला धडा शिकविला नसता तर आज बिहारमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री झाला असता.परंतु, दुधाने तोंड भाजल्यानंतर ताकही फुंकून प्यावे, या म्हणीप्रमाणे भाजपा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून मागे सरली. दुसरे कारण केंद्रात आता एनडीएत 17 खासदार असलेला एकमेव पक्ष जनता दल युनायटेडच आहे. अन्य सारे पक्ष एनडीएला सोडून गेल्याने त्यांना जदयूला सांभाळणे महत्त्वाचे आहे. त्यातच नितीशकुमार यांनी आधीपासूनच केंद्रीय मंत्रिमंडळात आपला सहभाग नोंदविलेला नाही. बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत कुरबुरही झाली असती तर ती भाजपाला परवडणारी नव्हती. भाजपाकडे केंद्रात बहुमत असले तरी बिहारमधून जर नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडले असते तर त्याचा फटका राज्यसभेत बसला असता. त्यामुळे सारासार विचार करीत भाजपाने सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडले असेच म्हणावे लागेल.

परंतु मुख्यमंत्रीपद सोडताना नितीशकुमारांना मनाप्रमाणे राज्यकारभार करता येणार नाही, याचीही व्यवस्था केली. सुशील मोदी सोबत असताना नितीशकुमार जे निर्णय घेत होते, तसे निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य त्यांना आता मिळणार नाही. नवीन उपमुख्यमंत्री म्हणून तारप्रसाद व रेणु देवी हे राष्ट्रीय राजकारणात परिचित नसले तरी बिहारच्या राजकारणात या दोघांचाही चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे वेळोवेळी दिल्लीश्वरांच्या सल्ल्याने भाजपाचा अजेंडा राबविण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. हीच खरी नितीशकुमार यांच्यासमोरील अडचण असेल. आता त्याचा सामना ते कसा करतात, हे आगामी काळात समोर येईल. कारण आतापर्यंत त्यांनी सहावेळा राज्याचा कारभार सांभाळला परंतु ते कुणासमोरही झुकले नाही. नितीशकुमार सर्वप्रथम 3 मार्च 2000 साली आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. परंतु, बहुमताची जमवाजमव करता न आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुन्हा लालुप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये सत्ता स्थापन केली.

दुसर्‍यांदा नितीशकुमारांनी 24 नोव्हेंबर 2005 रोजी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपासोबत युती असल्याने पाच वर्ष सरकार स्थिर होते. तिसर्‍यांदा 26 नोव्हेंबर 2010 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चौथ्यांदा नितीशकुमार यांनी 2015 साली मुख्यमंत्रीपद मिळवले. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार मोदी त्यांच्यासोबत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत लालुप्रसाद यादवांच्या राजदसोबत जाण्याचा निर्णय घेतला.त्यात ते यशस्वीदेखील झाले. त्यानंतर पाचव्यांदा पुन्हा 20 नोव्हेंबर 2015 साली नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी लालुप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. परंतु, दोन वर्षातच राजद व जदयूतील दरी वाढत गेली आणि नितीशकुमार यांनी राजीनामा दिला.

सहाव्या वेळी आरजेडीसोबत आघाडी तुटल्यानंतर एनडीएच्या नेतृत्वात तयार झालेल्या नव्या गठबंधनाच्या माध्यमातून नितीशकुमार यांनी पुन्हा 27 जुलै 2017 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी जदयूला मोठा धक्का बसला. नितीशकुमार यांचा निर्णय मान्य नसल्याने शरद यादव या जुन्या सहकार्‍याने त्यांची साथ सोडली. परंतु, नितीशबाबूंनी त्याची पर्वा केली नाही. या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जदयूला मोठा फटका बसला. 43 जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.तर भाजपाने 74 जागा मिळवत आपला दबदबा निर्माण केला. आता 17 नोव्हेंबर 2020 रोजी नितीशकुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली असली तरी टांगती तलवार कायम आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या