Saturday, May 4, 2024
Homeनगरबिनविरोध निवडणुकीबाबत 30 तारखेला अंतिम निर्णय

बिनविरोध निवडणुकीबाबत 30 तारखेला अंतिम निर्णय

बेलापूर |वार्ताहर| Belapur

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन बेलापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

- Advertisement -

होण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा या सर्वपक्षिय प्रमुखांनी मांडलेल्या सुचनेला कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

श्रीरामपूर तालुक्यात सर्वधिक लोकसंख्या असलेल्या बेलापूर बुद्रुक गावाची ग्रामपंचायत निवडणूक दिनांक 15 जानेवारी रोजी होत असून 17 जागांकरिता होणारी ही निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव बेलापूर पत्रकार संघाने गावातील नेते मंडळींसमोर मांडला होता. या प्रस्तावास सर्वपक्षिय प्रमुख नेत्यांनी मान्यता दिल्यानंतर काल पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा कोअर कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती.

त्या बैठकीतही सर्वांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय एकमताने घेतला. या बैठकीत बेलापूर ग्रामपंचायत सदस्य निवडीबाबत ठोस अशी रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी बेलापूर पत्रकार संघाचे खजिनदार सुनील मुथा यांनी सांगितले की, सर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्याला पॅनलचे उमेदवारी अर्ज दाखल करून दि. 30 डिसेंबर रोजी सर्व उमेदवारांची माहिती तसेच उमेदवारी अर्ज माघार घेण्याचे फॉर्म कोअर कमिटीकडे जमा करावेत.

या सर्व अर्जातून सर्वानुमते सतरा सदस्य निवडण्यात येतील व उर्वरीत उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. हा 17 जणांचा पॅनल हा गावचा पॅनल असेल. काहींनी जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर गावाचा पॅनल विरुध्द ते उमेदवार अशी लढत होईल. सर्व पक्ष गट तट विसरून एकत्र होऊन गावाच्या निर्णयाविरुध्द जाणार्‍या उमेदवारांविरुध्द विरोधात सर्वपक्षिय नेते मंडळी प्रचार करतील. या मुथा यांच्या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शविली.

यावेळी जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके, भाजपाचे शहर प्रमुख प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, साई पावन प्रतिष्ठानचे कैलास चायल भाऊसाहेब दाभाडे, सुधाकर खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय डाकले ,विक्रम नाईक, ईस्माईल शेख आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून या प्रस्तावास संमती दिली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, मारुती राशिनकर, रणजीत श्रीगोड, सुनील मुथा, नवनाथ कुताळ, प्रा. ज्ञानेश गवले आदी उपस्थित होते.पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या