Saturday, May 4, 2024
Homeनाशिक20 वर्षापासून सफाई कामगार घरकुलापासून वंचित

20 वर्षापासून सफाई कामगार घरकुलापासून वंचित

अभोणा l Abhona (वार्ताहर)

‘कुणी घर देत का घर’ असे म्हणत टाहो फोडणार्‍या नटसम्राटा सारखीच अवस्था अभोणा ता. कळवण येथील सफाई कामगार सुकलाल वाघ यांची झाली.

- Advertisement -

सफाई कामगार म्हणून सुकलाल यांची संपुर्ण हयात गेली असताना घरकुल मिळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व तालुका प्रशासनाचे उंबरठे झिजवून 20 वर्ष झाली आहे. परंतू एकही अधिकारी किंवा पदाधिकारी आमच्या गरीबांची दखल घ्यायला तयार नसल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येते. सुकलाल वाघ यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुले व सुना असे एकाच परिवारातील सहा जण सकाळी पाच वाजे पासून ते दुपारच्या मध्यंतराची वेळ वगळता दुपारी दोन ते पाच या वेळेत पुन्हा काम करतात.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कामावर असताना सुकलाल यांचा मोठा कर्ता मुलगा संदीप (40) हा ग्रामपंचातीचे गटार सफाईचे काम करून घरी परतला असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले. या कुटुंबातील कर्ता मुलगा गेला तरी ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत या कुटुंबाला केली तर नाहीच परंतू सांत्वन करण्यासाठी देखील कुणी आले नसल्याची खंत वाघ कुटुंबाकडून करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षापासून सुकलाल वाघ (60) या सफाई कर्मचार्‍याचे कुटुंब गुरांच्या दवाखान्यासाठी बांधलेल्या दगडी भिंतीना शेणामातीचा मुलामा देऊन राहतो आहे.

‘माझ्या मरणा अगोदर तरी माझ्या कुटुंबियांना एक चांगल्या घरात राहता आले पाहिजे ,अशी अपेक्षा हा सफाई कर्मचारी प्रत्येक निवडून येणार्‍या सरपंचांना आणि बदलणार्‍या ग्रामसेवकाकडे हात जोडून करत असतो. पण गरिबाला कुणी वाली नाही याचा प्रत्यय घरकुलापासून वंचित असलेल्या सुकलाल वाघ यांच्या कुटुंबियाकडे पाहून आल्याशिवाय राहत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या