Friday, May 3, 2024
Homeनगर85 आंतरजिल्हा शिक्षकांना झेडपीत बसण्याचा पगार!

85 आंतरजिल्हा शिक्षकांना झेडपीत बसण्याचा पगार!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या काही महिन्यांपासून आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या 85 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

यामुळे दिवसभर या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या आवारात बसून राहावे लागत आहे. या शिक्षकांना दिवसभर जिल्हा परिषदेत बसण्याचा पगार द्यावा लागणार, अशा वेगळ्याच चर्चेला पाय फुटले आहेत.

आंतरजिल्हा बदलीने बदलून येणार्‍या शिक्षकांना आधी जिल्हा पातळीवर हजर करून घेण्यात येते. त्यानंतर तालुकानिहाय रिक्त असणार्‍या पदाच्या प्रमाणानुसार संबंधित शिक्षकांना नेमणुका देण्यात येतात. जिल्हा परिषदेत टप्प्याने आतापर्यंत 85 प्राथमिक शिक्षक हे आंतरजिल्हा बदलीने बदलून आले. त्यांना तालुका पातळीवर रिक्त जागांनुसार पदस्थापना देण्यात आलेली नाही. यामुळे दररोज हे शिक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात असणार्‍या शिक्षण विभागातील हजेरीपुस्तीकेवर सह्या करून सायंकाळी घरी जातात.

आता लगेच या शिक्षकांना पगार देण्यात येणार नसला तरी ते शाळेवर हजर झाल्यानंतर त्यांचा पगार काढण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत दोनदा मुर्हूत टळला

जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने बदलून येणार्‍या शिक्षकांना पदस्थापना देण्याची प्रक्रिया दोनदा आयोजित करण्यात आली. मात्र, ही पदस्थापानेची प्रक्रिया रद्द करण्यात आली. ऐनवेळी कोठे माशी शिंकली हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही.

काहींची आर्थिक परिस्थिती बेताची

आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांचा पगार काही महिन्यांपासून बंद आहे. हे बाहेरच्या जिल्ह्यातून स्वजिल्ह्यात आले असून अद्याप ते शिक्षक बँकेचेही सभासद नाहीत. पगार नाही आणि बँकेकडून कर्जही घेवू शकत नाही. यामुळे काहींना आर्थिक अडचणींना सामोरे जात उसनवारी करण्याची वेळ आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या