Saturday, May 4, 2024
HomeनाशिकVideo : झाशीकर म्हणाले, कुसुमाग्रजांनीच आम्हास राणी दाखवली!

Video : झाशीकर म्हणाले, कुसुमाग्रजांनीच आम्हास राणी दाखवली!

नाशिकमध्ये तिसरे साहित्य संमेलन होत आहे. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. हा दिवस जागतिक मराठी गौरव दिवस म्हणून साजरा होतो. या दोन्ही निमित्तांचे औचित्य साधून नाशिकमधील मान्यवरांनी जागवलेल्या तात्यासाहेबांच्या आठवणी खास ‘देशदूत’च्या वाचकांसाठी…

आम्ही ज्या शहरात राहतो त्या शहरातील राणीचे जीवनचरित्र आम्हास आतापर्यंत कळाले नव्हते. झाशीची राणी अजून आम्हास पुरेशी समजलीच नव्हती. परंतु कुसुमाग्रजांच्या नाटकातून राणीचे जीवन आम्हास समजले. हजारो मैल लांब राहणार्‍या कुसुमाग्रजांनी आम्हाला आमची राणी कशी होती, हे आज दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया झाशीकरांनी व्यक्त केली होती,अशा आठवणी नाशिकमधील ज्येष्ठ सूत्रसंचालक शाम पाडेकर यांनी साहित्य संमेलन होणाऱ्या गोखले संस्थेच्या प्रांगणात सांगितल्या. त्यांनी सांगितलेल्या आठवणी त्यांच्यांच शब्दांत…

- Advertisement -

‘कुसुमाग्रज साहित्य दर्शन’ नावाचा दोन तासांचा कार्यक्रम आम्ही तयार केला होता. या प्रयोगात तात्यासाहेबांचे साहित्य दर्शन होते. त्यांच्या कवितांना चाली लावल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत ‘वीज म्हणाली धरतीला’ नाटक आम्हाला झाशीच्या किल्ल्यावर सादर करायचे होते. परंतु पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली नाही. मग राणी लक्ष्मीबाई यांचा साखरपुडा झाला त्या गणपती मंदिरात हे नाटक सादर केले. हे नाटक पाहून झाशीतील नागरिक भारावून गेले होते. त्यांच्या प्रतिक्रिया होत्या की, झाशीची राणी या नाटकातून आम्हास समजली. झाशीच्या राणीचे वेगवेगळे पैलू आम्हास कळाले.

मग तात्या श्रीराम म्हणायचे…

तात्यासाहेबांची आणि माझी पहिली भेट 1978 मध्ये झाली. मला नोकरीसाठी शिफारसपत्र लागत होते. मी त्यांच्याकडून शिफारसपत्र मागितले आणि त्यांनी ते लगेच दिले. त्यामुळे मला नोकरी मिळाली. त्यानंतर तात्यासाहेबांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाचा मी सदस्य झालो. वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्या.

त्यावेळी लोकहितवादी मंडळाकडून झालेल्या विविध कार्यक्रमांचा अहवाल सादर करण्यासाठी तात्यासाहेबांकडे नेहमी जाणे-येणे सुरू झाले. तात्यांशी असलेला संपर्क दिवसेंदिवस वाढत चालला होता. मला कविता लेखनाची आवड होती. मी लिहिलेली एखादी कविता तात्यांना ऐकवत असे. तात्याही शांतपणे ऐकून घेत असत.

कधी त्यांना लेखन कंटाळवाणे वाटले की ते श्रीराम म्हणायचे. मग आम्ही समजून जायचो, आता थांबायला हवे. परंतु तात्यांनी आपले लेखन ऐकले की भरून येत असे. आमच्यासारख्या नवीन साहित्यिकास आपण परमेश्वराच्या चरणी फूल अर्पण केल्याच्या भावना होत होत्या. नवीन मुलांना लिहिते करण्यासाठी विविध उपक्रम राबवा, असे तात्यासाहेब नेहमीच सांगत.

सर्वसामान्य माणसासंदर्भात कुसुमाग्रज खूप संवेदनशील होते. अनेकदा ते रात्री 10 वाजेनंतर पायी फिरायला जायचे. फिरता फिरता भेटणार्‍या सामान्य व्यक्तींशी हितगुज करत. त्यांना काही मदत हवी असेल तर ती तातडीने मिळेल याकडे त्यांचा कटाक्ष असे. गंगेवर रस्त्यांवर झोपलेल्या व्यक्तींना चादरी, ब्लँकेट ते नेहमीच पुरवत. आदिवासी पाड्यांवर जाऊन मदत करत.

नाटकांमध्ये केली सुधारणा

राज्य नाट्य स्पर्धेत लोकहितवादी मंडळाची नाटके असायची. त्यातील काही नाटकांमध्ये मी काम करायचो. पेठे विद्यालयात या नाटकांच्या तालमी व्हायच्या. त्यावेळी बर्‍याच वेळेस रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान तात्यासाहेब गुपचूप येऊन बसायचे. मग सराव झाल्यानंतर समोर यायचे. कोणता प्रसंग कसा हवा होता यासंदर्भात सूचना करायचे. अशा पद्धतीने आमच्या नाटकांमध्ये सुधारणा होत गेल्या.

(लेखक ज्येष्ठ सूत्रसंचालक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या