Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यारुग्णांना मिळेना खाटा; व्हेंटिलेटरसाठी रांगा

रुग्णांना मिळेना खाटा; व्हेंटिलेटरसाठी रांगा

नाशिक । प्रतिनिधी

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खरडपट्टी काढल्यानंतरही यंत्रणा ढिम्म असून करोना रुग्णांना बेड मिळत नसून व्हेंटिलेटरसाठी वणवण करावी लागत आहे. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून कागदावरच 4 हजार 500 बेड व 228 व्हेंटिलेटर सज्ज असल्याची जय्यत तयारी दाखवली जात असून प्रत्यक्षात हा अनागोंदी कारभार रुग्णांच्या जीवावर बेतत आहे.

- Advertisement -

पालकमंत्री भुजबळ यांनी यंत्रणेला तीन दिवसांचा अल्टीमेटम देत बेड व व्हेंटिलेटरची व्यवस्था करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात नव्याने साडेचार हजार वाढीव खाटांची उपलब्धी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र आजही रुग्णांना खाटाच मिळत नसल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 30 हजार पार गेली आहे. शिवाय दिवसाला चार ते पाच हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची वाढ होत आहे. यामुळे हा आकडा अत्यंत वेगाने वाढत असून, त्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा अपुर्‍या पडत आहे.

विशेष म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमधील 70 टक्के रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. म्हणजे अवघे 30 टक्के रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत. असे असतानाही या प्रमाणात खाटा मिळत नसल्याचे चित्र साडेचार हजार खाटा उपलब्ध झाल्याची घोषणा केल्याच्या दुसर्‍याच दिवशी निर्माण झाले आहे. वाढीव साडेचार हजार खाटांमध्ये नाशिक मनपा हद्दीत 2 हजार, जिल्हा रुग्णालयात 1 हजार 50 आणि उर्वरित 1 हजार 500 खाटा या ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

शिवाय यापुर्वीच जिल्ह्यात सरकारी आणि खाजगी मिळून 17 हजार 535 खाटा उपलब्ध आहे. म्हणजे एकूण 22 हजारांवर खाटा जिल्ह्यात उपलब्ध असताना शासकीय अन् खासगी सर्वच रुग्णालयांतील 80 टक्के खाटा या कोव्हीडसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही खाटाच उपलब्ध नाहीत. 3 हजार 748 ऑक्सिजन बेड्स अन् 750 आयसीयू तर 506 इतके व्हेंटीलेटर बेड उपलब्ध असल्याने द्यावे तर कुणाला हा प्रश्नही यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटर नव्हे तर साधे केवळ डॉक्टरांच्या निगराणीखाली राहाण्यासाठी देखील खाटा मिळत नसल्याने उपचाराअभावी रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या