Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशकुंभमेळा प्रतिकात्मक साजरा करा; पंतप्रधान मोदींचे आवाहन

कुंभमेळा प्रतिकात्मक साजरा करा; पंतप्रधान मोदींचे आवाहन

दिल्ली | Delhi

भारतात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यातही करोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे.

- Advertisement -

कुंभमेळ्यात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून अनेक आखाड्यांच्या साधू-संतांना करोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील गर्दी आणि करोनाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन इथून पुढचा कुंभमेळा केवळ प्रतिकात्मक ठेवावा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचं आवाहन केलं आहे. स्वामी अवधेशानंद गिरि यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. सर्व संतांच्या आरोग्याबाबत जाणून घेतले. मी त्यांना अवाहन केले की देशातील दोन्ही शाही स्नान झाली आहेत. त्यामुळे आता कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करायला हवा. ही करोना विरुद्धची लढाई आहे. एकत्र लढल्याने ताकद मिळेल. सर्व साधू संतांनी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

यानंतर स्वामी अवधेशानंद यांनी लोकांना कुंभमेळ्यात स्नानासाठी न येण्याची विनंती केली आहे. तसेच, करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचेही त्यांनी आवाहन केले. इतरांच्या प्राणांची सुरक्षा बाळगणेही पुण्याचे काम असल्याचे ते म्हणाले.

तसेच सध्याच्या कुंभमेळ्यात कित्येक साधू आणि भाविकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, निर्वाणी अखाड्याच्या महामंडलेश्वरांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर काही आखाड्यांनी आपल्यापुरता कुंभमेळा आटोपता घेतला आहे. एरवी १२ वर्षांमधून एकदा होणारा हा कुंभमेळा जानेवारी ते एप्रिलपर्यंत घेण्यात येतो. मात्र, करोनामुळे याचा कालावधी १ ते ३० एप्रिलपर्यंतच ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या