Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशभारतात लॉकडाऊन गरजेचा; अमेरिकेच्या वरिष्ठ आरोग्य सल्लागाराचं मत

भारतात लॉकडाऊन गरजेचा; अमेरिकेच्या वरिष्ठ आरोग्य सल्लागाराचं मत

दिल्ली | Delhi

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी ठरत आहे. देशातील करोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला अमेरिका प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी एस फौसी यांनी दिला आहे. डॉ. अँथनी एस फौसी बायडेन प्रशासनात मुख्य आरोग्य सल्लागार आहेत.

- Advertisement -

डॉ. फौसी यांनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारत या वेळी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याची गरज आहे.

डॉ. फौसी बोलतांना म्हणाले की, ‘भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही आठवड्याचा लॉकडाउन लावण्याची गरज आहे. लॉकडाउन लावल्यानंतर सरकार आणि प्रशासनानं तीन पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडून टास्क फोर्ससारखी एखादी टीम तयार करावी लागेल. या टास्कफोर्सनं तीन पातळ्यांवर विचार करण्याची गरज आहे. त्यामध्ये पहिली महत्वाची बाब, सध्याची परिस्थिती कशी हाताळावी लागेल. पुढील १५ दिवसांत होणाऱ्या परिस्थितीबाबतची तयारी करण्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि दुसरी लाट वाढू नये म्हणून काय तयारी करु शकतो. यावर टास्कफोर्सनं काम करायला हवं.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, ‘देशातील सध्याची परिस्थिती हाताळत असतानाच लसीकरणही वाढवावं लागेल. कारण, लसीकरण वाढवल्यानंतर करोनाची दुसरी लाटही आटोक्यात येण्याची शक्यता जास्त आहे.’ तसेच ‘मी टीव्हीवर पाहत आहे की, भारतामध्ये रुग्णालयांची स्थिती अत्यंत खराब आहे. लोक मोठ्या संख्येने रूग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत. अशावेळी युद्धपातळीवर रुग्णालये उभारली गेली पाहिजेत. यासाठी त्यांनी चीनचे उदाहरण दिले. चीनमध्ये लॉकडाऊन दरम्यान काही आठवड्यांत तात्पुरती रुग्णालये उभी केली होती. अशाप्रकारे रुग्णालये उभारण्यासाठी अमेरिकेच्या धर्तीवर सैन्याची मदत घेतली जाऊ शकते.’ असंही त्यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ५२३ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. देशात गेल्या २४ तासांत ४ लाख ०१ हजार ९९३ नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ११ हजार ८५३ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात २ लाख ९९ हजार ९८८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ वर पोहचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या