Saturday, May 4, 2024
Homeनगरखरीप हंगामासाठी पावणे सात लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

खरीप हंगामासाठी पावणे सात लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगामाचा कलावधी आला असून कृषी विभागाची हंगामाच्या तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते आणि किटक नाशकांचा पुरवठा करण्यासोबत पेरणी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. हवामान खात्याने यंदा 98 ते 100 टक्के पाऊस वर्तावला असल्याने यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 6 लाख 74 हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यात वाढ अथवा घट करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग खरीप हंगामाची तयार करत असते. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही करोनामुळे एप्रिल आणि मे महिन्यांत लॉकडाउनची परिस्थिती असल्याने कृषी विभागाकडे अन्य फारसे काम नसल्याने कृषी विभागाने आता खरीप हंगामाच्या नियोजनावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. हंगामासाठी आवश्यक बियाणे, खतांचा पुरवठा याच सोबत आवश्यक किटक नाशकांचा पुरवठा लॉकडाऊन असला करून घेण्याच्या प्रक्रिया कृषी विभागाकडून सुरू आहे.

जिल्ह्यात 15 जून ते 15 ऑगस्ट हा खरीप हंगामाचा पेरणीचा कालावधी असून जिल्ह्याच्या भौगोलिक रचना आणि पडणार्‍या पावसानूसार खरीप हंगामासाठी पिके घेण्यात येतात. यात दक्षिण जिल्ह्यात प्रमुख्याने कडधान्य पिकांचा अधिक समावेश आहे. दुसरीकडे अकोले आणि पारनेर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यात नगदी पिक म्हणून ओळख असणार्‍या कपाशीचे पिक घेण्यात येते.

जिल्ह्यातील एकूण कपाशी पिकाच्या लागवडीमधील 50 टक्के क्षेत्र हे शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात घेण्यात येते. खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनात सर्वाधिक क्षेत्र हे बाजारी पिकाचे 1 लाख 55 हजार हेक्टर, कपाशी 1 लाख 33 हेक्टर घेण्यात आलेले आहे. यासह उडिद, मूग, तूर आणि मका या पिकांचे क्षेत्र लक्षणीय आहे.

उत्तर नगर जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर पिक अधिक प्रमाणात घेण्यात येते. यासह चारा पिकांसोबत मका पिकाचे प्रमाण जास्त असते. तर नगर आणि पारनेर तालुक्यात मूग पिक, कर्जतमध्ये 20 टक्के आणि जामखेडमध्ये 80 टक्के असे जवळपास 100 टक्के उडिदाचे पिक घेण्यात येते. अकोले तालुक्यात सर्वाधिक भात पिक घेण्यात येतो.

शेतकर्‍यांनी सोयाबिनचे जतन करून ठेवलेले बियाणे उत्पादकता तपासून वापरण्यास हरकत नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यासाठी सोयाबिनसह अन्य सरळ वाण असणार्‍या मूूग, उडिद आणि तूरीचे घरगुती बियाणे वापरण्यास हरकत नाही. मात्र, या पिकांचे शंभर बियाणातून 70 ते 75 टक्के उगवण क्षमता आहे की नाही याची खात्री करावी. यासह या बियाण्यावर बीज आणि जैविक प्रक्रिया करून त्याचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

क्षेत्र नियोजन

बाजरी 1 लाख 55 हजार हेक्टर, कापूस 1 लाख 33 हजार हेक्टर, सोयाबिन 94 हजार 544 हेक्टर, पावसाळी भूईमूग 9 हजार 608 हेक्टर, उडिद 52 हजार 178 हेक्टर, मूग 54 हजार 366 हेक्टर, तूर 65 हजार हेक्टर, मका 74 हजार 543 हेक्टर आणि भात 19 हजार 203 हेक्टर या पिकांसह चारा पिके, ऊस यांचे क्षेत्र स्वतंत्र राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या