Saturday, May 4, 2024
Homeनगरचोरीचे बिंग फुटू नये म्हणून केली सार्थकची हत्या

चोरीचे बिंग फुटू नये म्हणून केली सार्थकची हत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तालुक्यातील खुंटेफळ येथे सोमवारी 11 वर्षीय सार्थक आंबादास शेळके या मुलाची हत्या झाली होती. या हत्येचे कोडे उलगडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने आपले चोरीचे बिंग फुटू नये म्हणून ही हत्या केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.

- Advertisement -

शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सोमवार (दि. 10) सायंकाळी धारदार शस्त्राने मानेवर वार करून सार्थक शेळके (वय 11 वर्षे) याची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मयत सार्थकचे वडील अंबादास शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकर्‍याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेमध्ये फिर्यादी अंबादास शेळके हे कुटुंबासमवेत घराबाहेर काम करत होते. यामुळे घरात कोणी नाही असे पाहून आरोपी हा चोरी करण्यासाठी शेळके यांच्या घरात गेला होता. मात्र त्याचवेळी मयत सार्थक शेळके हा तेथे आल्याने आपले बिंग फुटू नये म्हणून आरोपीने हातातील धारदार शस्त्राने सार्थक शेळके याच्या मानेवर वार करून जखमी केले होते.

तपासात वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू असताना एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याची माहिती पोलिसांना समजली. या माहितीची खातरजमा करून आरोपीला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. अल्पवयीन आरोपीने यापूर्वी देखील फिर्यादी यांच्या घरी चोरी केली असल्याचे निरीक्षक कटके यांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या