Tuesday, September 17, 2024
Homeजळगावदुचाकीवर जाणार्‍या विवाहितेसह १७ वर्षीय मुलीला ट्रकने चिरडले

दुचाकीवर जाणार्‍या विवाहितेसह १७ वर्षीय मुलीला ट्रकने चिरडले

जळगाव – प्रतिनिधी

- Advertisement -

खोटे नगरकडून जळगाव शहरातकडे दुचाकीने जात असलेल्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने चिरडल्याने विवाहितेसह १७ वर्षीय मुलगी दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मानराज पार्कजवळ बुधवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर सोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर वय १७ आणि दिक्षिता राहूल पाटील वय २७ दोन्ही रा. द्वारकाई अपार्टमेंट, वाटिकाश्रम जळगाव असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील वाटिकाश्रम येथील द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील या विवाहिता माहेरी आलेल्या होत्या. तसेच या अपार्टमेंटमध्ये राहणारे नीलेश पाटील यांना मुलगा झाला होता. त्यामुळे त्या मुलाला पहाण्यासाठी दिक्षिता पाटील या विवाहिता आपल्या तीन वर्षाचा मुलगा रूद्र आणि पायल जलंकर यांच्यासोबत बुधवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दुचाकी क्र. एमएच १८ एएस ५३७९ ने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या. खोटे नगरकडून जळगाव शहराकडे दुचाकीने जात असतांना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देवून दोघांना चिरडले.
दोघे जागीच ठार
या अपघात दिक्षिता आणि पायल या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला रूद्र हा गंभीर जखमी झाला. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. जिल्हा सामान्य रूग्णालयात दोघांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिक्षिता पाटील ह्या नाशिक येथील रहिवाशी असून त्यांच्या वडीलांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून त्या माहेरी वाटिकाश्रम येथे आलेल्या होत्या. तर पायल ही आई वडील व लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती.
ट्रकचालकाला पकडले
अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. मात्र त्याला भुसावळकडे जात असतांना नशिराबाद येथे ताब्यात घेण्यात आले. दरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयात आमदार राजूमामा भोळे यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या