अहमदनगर | प्रतिनिधी
मुलांचे भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांवर लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने हल्ला झाला. शनिवारी रात्री उशीरा नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी (दि. 15) रात्री एकविरा चौकात ही घटना घडली असून याप्रकरणी रविवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब भानुदास सोमवंशी (वय 42 रा. वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. गावडे मळा, पाईपलाइन रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बुलाख, सुरज उर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुर्हे, राजू फुलारी व इतर सात ते आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री चत्तर यांच्या शेजारी राहणार्या एका मुलाचे एकविरा चौकात काही मुलांसोबत भांडण झाले होते. त्या मुलाने चत्तर यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले.
चत्तर यांनी घटनास्थळी जात भांडण करणार्या मुलांना समजावून सांगून भांडण मिटविले व घटनास्थळावरून काढून दिले. त्याचवेळी भांडण करणार्यांपैकी राजू फुलारी याने अंकुश यांना उद्देशून, ‘मला तुम्हाला काही बोलायचे आहे,’ असे म्हणून थांबविले व त्यांच्यासोबत बोलत होता. त्याचवेळी तेथे दोन दुचाकी व दोन काळ्या रंगाच्या गाड्या तेथे आल्या. त्यातील एका गाडीच्या पाठीमागील काचेवर देवास असे लिहिलेले होते व त्या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या शेजारील शीटवर नगरसेवक शिंदे बसलेला होता. त्या गाड्यांतून काही मुले खाली उतरले व गाड्या निघून गेल्या. उतरलेल्या मुलांमध्ये अभिजित बुलाख, सुरज उर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुर्हे व इतर सात ते आठ जण होते. त्यांच्याकडे लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे होते. त्यापैकी महेश कुर्हे याच्याकडे गावठी कट्टा होता. ते सर्वजण चत्तर यांच्या दिशेने चालून आले व त्यांना म्हणाले,‘तुला आम्ही जिवंत सोडणार नाही, तु स्वप्निल भाऊंच्या नादी लागतोस का ? तुला स्वप्निलभाऊ काय आहे ते दाखवतो आता,’ असे म्हणून सुरज उर्फ मिक्सा कांबळे व त्याच्यासोबतच्या इतरांनी चत्तर यांना लोखंडी रॉड, वायर रोपने मारहाण करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, हल्ला झाल्यानंतर जीव वाचविण्यासाठी चत्तर हे सिटी प्राईड हॉटेलच्या दिशेने पळत होते. मारेकरी त्यांच्या पाठीमागे पळून त्यांना मारत होते. चत्तर हे खाली पडले तेथे स्वप्निल शिंदे आला व म्हणाला,‘हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्यास संपवून टाका व चला लवकर,’ असे म्हणताच त्याच्या साथीदारांनी पुन्हा चत्तरवर हल्ला केला व ते सर्वजण वाहनातून पसार झाले. चत्तर यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळावरून काही शस्त्र व सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा तपास केला जात आहे. त्यासाठी काही पथके स्थापन केली आहेत. चार संशयितांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चत्तर व शिंदेचे पूर्ववैमनस्य
अंकुश चत्तर हे सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे व नगरसेवक स्वप्निल शिंदे याचे जुने वाद होते. त्यांचे दोघांचे पटत नव्हते. नगरसेवक शिंदे सोबत असलेल्या पूर्ववैमनस्यातूनच शनिवारी रात्री चत्तर यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सावेडी दहशतीखाली
शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप शहर पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत याकडे लक्ष वेधले आहे. शनिवारी रात्री एकविरा चौकात ‘फिल्मी स्टाईल’ थरार अनेकांनी प्रत्यक्षदर्शी पाहिला. लोकांनी आपआपली दुकाने बंद करून घेतली व अनेकांनी हा प्रकार पाहून तेथून काढता पाय घेतला. सावेडी उपनगर दहशतीखाली आहे.