Saturday, May 25, 2024
Homeनगरसंगमनेरात करुणा धनंजय मुंडे यांना 30 लाखाला फसविले, तिघांविरुद्ध गुन्हा

संगमनेरात करुणा धनंजय मुंडे यांना 30 लाखाला फसविले, तिघांविरुद्ध गुन्हा

संगमनेर | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

- Advertisement -

लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड नावाच्या कंपनीत पैसे गुंतवल्यानंतर दरमहा ४५ हजार ते ७० हजार रुपये मिळवा, असे अमिष दाखवून संगमनेरच्या तिघा जणांनी करुणा धनंजय मुंडे यांना ३० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी श्रीमती मुंडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती कोंची, पोस्ट निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (दोघे ही राहणार घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी करुणा धनंजय मुंडे यांचा विश्‍वास संपादन करीत त्यांना लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी बाबत माहिती दिली.

आमच्या या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होईल, तुम्ही जर मला ३० लाख रुपये दिले तर मी तुम्हाला कमीत कमी ४५ हजार ते ७० हजार रुपये महिन्याला नफा देईल तसेच यापेक्षा जास्त फायदा झाला तर तर त्याप्रमाणात तुम्हाला नफा देत जावू या पद्धतीने वरील तिघांनी करुणा मुंडे यांना पटवून दिले. त्याप्रमाणे श्रीमती मुंडे यांनी वरील तिघांना १० दिवसात कॅश व चेक स्वरुपात असे एकूण ३० लाख रुपये दिले.

मात्र त्यानंतरही वरील तिघांनी कंपनीबाबत काही एक महिती दिली नाही. तसेच कुठलाही नफा दिला नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये एकदाच वरील तिघांनी मुंडे यांना ४५ हजार रुपये दिले. त्यानंतर मुंडे यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. व खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. व पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे करुणा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती कोंची पोस्ट निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (दोघे ही राहणार घुलेवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या