धुळे – प्रतिनिधी dhule
कर्तव्यावर असतांनाच नवापूर (Navapur) एसटी डेपोमधील नवापूर-चाळीसगाव (chalisgaon) बसवरील (bus) वाहकाने मद्य प्राशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. बसमधील प्रवाशांच्या तक्रारीनुसार वाहकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत धुळे बस आगारातील मालवाहतूक विभागातील अजय शिवाजी जावरे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि.४ मे रोजी नवापूर डेपोमधील नवापूर-चाळीसगाव बस चालक सचिन पावबा धनगर आणि वाहक मंगेश माणिकराव पांचाळ हे धुळे बसस्थानक आवारात त्यांचे ताब्यातील बसने (क्र.एम.एच.१४/बीटी २११४) धुळे बस आगारात दुपारी साडेबाराच्या सुमारास आले. त्यानंतर बसमधील प्रवाशांनी बसस्थानक प्रमुख आर.आर. वाघ यांच्याकडे वाहक दारूच्या नशेत असल्याची तक्रार केली. त्यानुसार डेपो मॅनेजर यांनी वाहकाला बोलावुन खात्री केली. तेव्हा वाहक मंगेश पांचाळ याने मद्य प्राशन केल्याचे आढळून आले. त्यानंतर डेपो मॅनेजर यांनी वाहकाला धुळे शहर पोलीस ठाण्यात नेवुन कारवाईच्या सुचना केल्या. त्यानंतर मेडिकल तपासणीनुसार वाहक दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी वाहक मंगेश पांचाळ याच्याविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम ८५ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ.डी.एम.साळुंके हे करीत आहे.