धुळे । प्रतिनिधी dhule
शहरातील जिल्हा न्यायालयासह आवारामध्ये माजी जिल्हा सरकारी वकील अॅड.शामकांत पाटील यांची न्यायालयातील बोलती बंद करण्यासाठी त्यांच्यावर जादुटोणा केल्याप्रकरणी देवपूरातील एकावर शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अॅड.शामकांत रावजी पाटील (वय 67 रा. प्लॉट नं. 23, गरूड कॉलनी, देवपूर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निसार शेख आमिर खाटीक याने पंढरीनाथ भिला पाटील यांच्या विरोधात दिवाणी दावा क्र. 219-2016 प्रमाणे धुळे येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांच्या न्यायालयामध्ये चालु आहे. या दाव्याच्या अंतिम युक्तीवादामध्ये जास्त बोलू नये किंवा बोलती बंद करण्यासाठी निसार खाटीक हा न्यायालयाच्या इमारत व आवारामध्ये विना परवानगी अॅड. पाटील यांचा फोटो काढणे तसेच मोबाईल वापरणे प्रतिबंध असतांना वकील कक्षात जावून त्यांचा फोटो काढत होता. त्यावर जादुटोणा करण्यासाठी नाशिक येथील मौलाणा यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपव्दारे पाठविले.
तसेच पक्षकार पंढरीनाथ पाटील यांचे देखील न्यायालयाच्या आवारात फोटो काढले. म्हणून निसार खाटीक याच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चारन करण्याबाबत अधि 2013 चे कलम 3 (2) माहिती तंत्रज्ञान अधि 2000 चे कलम 66 (क) प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे करीत आहेत.