नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
अनधिकृत बिनशेती वापर शर्त बंद प्रकरणे भोगवटदार वर्ग-२ चे रुपांतर भोगवटदार वर्ग १ मध्ये करण्यासाठी बनावट दस्तावेज तयार करुन शासनाची १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार येथील तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारच्या इतिहासात जिल्हाधिकार्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२२ फेब्रुवारी २०१९ ते १८ जुलै २०१९ या कालावधीत नंदुरबारात कार्यरत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे शासनाने दिलेली महसुली उदिष्टे साध्य करण्यासाठी अनधिकृत बिनशेती वापर शर्त बंद प्रकरणे
भोगवटदार वर्ग-२ धारणा अधिकार भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्याच्या एकुण १६ प्रकरणात सहाय्यक जिल्हा निबंधक आणि जिल्हाधिकारी मुद्रांक नंदुरबार यांच्याकडुन मुल्यांकन अहवाल न घेता नजराना/रुपांतरण अभिमुल्य रक्कम निश्चित करुन किंवा
इतर अनियमितता करुन शासनाचे एकुण १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. तसेच उर्वरीत चार प्रकरणात शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच सदरचा आदेश पारित करतांना बनावट जावक क्रमांक आदेशावर नोंदविले आहे व त्यांची जिल्हाधिकारी म्हणुन प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केला.
तसेच या प्रकरणात आदेश पारित करण्याचे किंवा मंजुरी देण्याचे सर्वतोपरी अधिकार शासनाचे आहेत. याची त्यांना सुरुवातीपासुन जाणीव असतांनादेखील मंजूळे यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने सदरचे आदेश पारित केलेले आहेत. तसेच प्रत्यक्षात सदर आदेशांना देण्यात आलेल्या
क्रमांकावर इतर प्रकरणांचीच नोंदणीही आलेली आहे. चौकशीमध्ये सदरचे प्रकरणे कार्यालयात दाखल न होताच सदरचे आदेश तयार करण्यात आल्याने सदरचे बनावट दस्तऐवजद्वारे शासनाची फसवणुक व ठकवणूक करून शासनाचे नुकसान केलेले आहे.
बालाजी मंजुळे हे जिल्हाधिकारी पदावर असतांना शासनाच्या हिताचे व हितसंबंधाचे संरक्षण करण्यास विधीताबद्ध असतांनादेखील त्यांनी शासनाची फसवणूक करुन अप्रामाणिकपणाच्या मालमत्तेचे नुकसान पोहचेल अशा उद्देशाने खोटे दस्तावेज बनविले व शासकीय बनावट दस्तावेज तयार करुन शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज तयार करुन तो वापरुन शासनाचे आर्थिक नुकसान करुन फसवणूक केली.
याबाबत तहसिलदार अनिल बन्सी गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारी तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.