मुंबई | Mumbai
शिवसेना (Shivsena Uddhav Thackeray Group) गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी अखेर रवींद्र वायकर, त्यांची पत्नी तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल (Case Registered Against Ravindra Vaikar) करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा सखोल तपास देखील केला जाणार आहे. आमदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिके त्या बांधकामाची परवानगी नाकारत कामाला स्थगिती दिली होती.
Maharashtra Rain Update : राज्यातील ‘या’ भागांत आजपासून मुसळधार पावसाची शक्यता
यासोबतच, रवींद्र वायकर यांच्या हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने रवींद्र वायकर यांच्या हॉटेलमधील नव्याने होत असलेल्या बांधकामाची परवानगी नाकारत स्थगिती दिली.
याचबरोबर, रवींद्र वायकर यांच्या भूखंड घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राथमिक तपास करण्यात आला होता. या प्रकरणी रवींद्र वायकर यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे रवींद्र वायकर मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. पण तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आता थेट आर्थिक गुन्हे विभागाने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.