राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परसबाग फुलवण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. परसबागेत विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या फळभाज्यांचा विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात समावेश करण्यात येणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे. विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, त्यांना पोषक आहार मिळावा, त्याची कुपोषण दूर होण्यासाठी मदत होऊ शकेल, असा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. उत्कृष्ट परसबाग स्पर्धाही घेतली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पारंपरिक शिक्षणाबरोबरच जीवनकौशल्यांचे महत्व वादातीत आहे हे कोणीच नाकारणार नाही. आजकाल अनेक शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या आरंभी मुलांना विविध खेळ जाणीवपूर्वक खेळायला लावले जातात. माती खेळणे, भाज्या निवडणे, तांदूळ निवडणे अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात आढळतो. आता भाज्या पिकवण्याचा समावेश त्यात होऊ शकेल. बहुसंख्य, विशेषतः शहरी भागातील मुलांना मातीचा स्पर्श दुर्मिळ झाला आहे. मुलांचे खेळणेच जिथे थांबले आहे तिथे मातीत किंवा माती खेळण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सरकारच्या वरील निर्णयामुळे ही उणीव दूर होऊ शकेल. मुले भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, अशी पालकांची तक्रार असते. मुले भाज्या पिकवण्याची प्रक्रिया अनुभवातील. ते करता-करता शिक्षक त्या भाज्यांमधील पौष्टिक तत्वे मुलांना सांगू शकतील.
मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या चौरस आहारातील भाज्यांचे महत्व मुलांना समजू शकेल. त्यांनीच पिकवलेल्या भाज्या खाण्याची इच्छा मुलांच्या मनात जागू शकेल. आणखी एक महत्वाचा संस्कार मुलांवर होऊ शकेल. भाज्या पिकवणे आणि त्यानिमित्ताने अन्नधान्य पिकवणे किती कष्टसाध्य आहे हे मुलांना कळू शकेल. अन्न वाया घालवणे ही गंभीर सामाजिक समस्या आहे. सार्वजनिक समारंभ, विवाह सोहळे, कौटुंबिक कार्यक्रम अशा अनेक समारंभांत लोक अन्न वाया घालवतात. त्यांच्या वयाचा विचार न करता मुले ताट वाढून घेतात. ताटात वाढून घेतलेले सगळे पदार्थ संपण्याची शक्यता कमीच; त्यामुळे उरलेले अन्न फेकून दिले जाते. घराघरांत रोजचे उरलेले अन्नसुद्धा सर्रास फेकले जाते. किती पालक याबाबत जागरूक असतात? जेवढे हवे तेवढेच वाढून घ्यावे, असे किती पालक जाणीवपूर्वक मुलांना शिकवतात? मुलेच ती; मोठयांची कृती अमलात आणतात.
शाळेच्या परसबागेत भाज्या पिकवण्यानिमित्त मुलांना ती प्रक्रिया किती कष्टाची आहे हे समजले तर त्यांची अन्नाविषयीची समज कदाचित वाढू शकेल. अन्न फेकू नये, वाया घालवू नये अशी भावना त्यांच्या मनात जागी होऊ शकेल. मुले भाज्या आनंदाने खायला शिकतील. अर्थात हे सगळे निर्णयाच्या सकारात्मक अंलबजावणीवर अवलंबून आहे. संबंधित सर्व घटकांचा या निर्णयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तितकाच महत्वाचा ठरावा. आणखी एक काम वाढले, शाळेत मुलांनी अभ्यास करायचा की, भाज्या पिकवायच्या? पारंपरिक अभ्यास पूर्ण करायचा की शेती करायची? असे आक्षेप कदाचित घेतले जाऊ शकतील. अनेक शाळांना मैदाने नाहीत. किती शाळांना परसबाग असू शकेल? हाही मुद्दा नाकारता येईल का? तथापि निर्णयाची अंमलबजावणी कदाचित ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारणारी ठरू शकेल.