Wednesday, October 30, 2024
Homeशब्दगंधस्वच्छ मन आणि मानवी सहसंबंध

स्वच्छ मन आणि मानवी सहसंबंध

सुरेखा अशोक बोर्‍हाडे

मानवाच्या अस्तित्वाचा विचार केला तर त्यामध्ये माणसाचे मन अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचे मन हे चेतनामय असते. माणसाच्या शरीरातील मन ही गोष्ट न दिसणारी परंतु त्या व्यक्तित्त्वाला पूर्ण काबूत ठेवणारी, त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकणारी गोष्ट असते.

- Advertisement -

मन:शक्तीमुळे माणूस हा सर्व प्राण्यांमध्ये सृष्टीचा मुकुटमणी ठरला आहे. खाणीत पडलेले सोने आणि रत्न यांनाही तेव्हाच महत्त्व प्राप्त होते जेव्हा सजीव माणसाचे मन त्याला महत्त्व देते. नाहीतर त्याचेही मोल मन नसलेल्या माणसाच्या अचेतन जड देहातील मातीप्रमाणे असते. मानवाच्या जीवनातील त्याचे श्रेष्ठत्व, महत्त्व, समृद्धी, विकास हे तो माणूस जे काही कर्म करतो त्यावर अवलंबून असते आणि हे सर्व त्याचे जे कर्म डोळ्यांनी दिसते ते त्याच्या मनातील अदृश्य विचारशक्तीद्वारे घडत असते.

व्यक्तीच्या जन्मानंतर मन सुप्तावस्थेत असते. शरीराच्या वाढीबरोबर हळूहळू तेही विकसित होत असते. पौष्टिक आहारामुळे जसे शरीर पुष्ट होते तसेच चांगले विचार, संस्कार, शिक्षण यामुळे मनाला योग्य वळण प्राप्त होत असते.

माणसाचे मन जर स्वच्छ, निर्मळ असेल तर त्याच्या मनामध्ये चांगल्या विचारांचीच निर्मिती होते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,

आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे

आपणासि डोळे दृष्टी नाहीं॥1॥

रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न

तोंडासि कारण चव नाही॥2

तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण

तया त्रिभुवन अवघें खोटें॥3॥

मनुष्याची प्रगती आणि अधोगती यामध्ये मनाची भूमिका मोठी असते. त्यात माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने समाजामध्ये राहणे त्याला आवडते. माणसाची अन्न, वस्त्र, निवारा यानंतरची जर कोणती महत्त्वाची प्राथमिक गरज असेल तर ती असते मानसिक, भावनिक सुरक्षितता. ही गरज भागवण्यासाठी माणसाला जन्मापासून काही नाती मिळतात तर काही नात्यांचे जाळे तो जीवन जगताना आपल्या सभोवताली विणत असतो. ज्यातून त्याची मानसिक, भावनिक सुरक्षिततेची गरज तो भागवत असतो. हे नातेसंबंधही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. हे नातेसंबंध कसे निर्माण करायचे, किती भक्कमपणे टिकवायचे या गोष्टी व्यक्तीच्या मनावर म्हणजेच त्याच्या वागण्यावर अवलंबून असतात.

माणसाचे मन स्वच्छ, निर्मळ असेल तसेच त्याला जग दिसत असते. ‘जशी दृष्टी, तशी सृष्टी’ असे म्हणतात ते उगाच म्हणत नाही.

बर्ट कामू तर म्हणतात, संबंधातून अस्तित्व निर्माण होते. म्हणूनच असे म्हणता येईल की, मन आणि नातेसंबंध परस्परावलंबी आहेत. स्वच्छ मनामध्ये श्रेष्ठ विचारांचा वास असतो. व्यक्तीच्या मनाच्या सकारात्मकतेमुळे नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता वाढत जाते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. परस्पर संबंध बनवण्यासाठी बोलणे, व्यवहार, पैसा यापेक्षा महत्त्वाचे जर काही आहे तर ती म्हणजे नात्यांमधील, विचारातील सकारात्मकता. ही सकारात्मकता नात्याला पक्केपणा आणते, स्वतःकडे खेचते. जर मनामध्ये नकारात्मकता असेल तर संबंध बिघडतात. व्यक्तीची स्वार्थलोलुपता दुसर्‍याबद्दलच्या चांगल्या विचारांना वाढू देत नाही. सर्व मला हवे, मी म्हणजे महत्त्वाचा, मी म्हणतो ते खरे अशा मनोवृत्तीच्या माणसापासून लोक आपोआपच दूर जातात. परंतु जे नि:स्वार्थ भावाने आपल्यापेक्षा समोरच्याचा विचार करतात, समोरच्याला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे हे ओळखून ती करण्यासाठी पुढे येतात तेव्हा अशावेळी आपोआपच त्यांच्यामध्ये भावनिक बंध तयार होतो आणि तो टिकून राहतो.

यासाठी व्यक्तीमध्ये निरोगी मन आणि आपापसातील आरोग्यदायी सहसंबंध निर्माण होणे आवश्यक आहे. कारण स्वच्छ मन आणि सकारात्मक नातेसंबंध मानवी जीवनाच्या सुखाचे निधान आहे!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या